Thursday, 12 November 2015

रांगोळी.....


     रांगोळीमुळे सण - उत्सवांचे मांगल्य, पावित्र्य वाढते.
शुभसुचक अशुभ निवारक असलेली ६४ कलांमधील एक कला.....

     लहान असतांना संगमरवरचे तुकडे शोधायचे, ते कुटायचे, मग वस्त्रगाळ चाळायचे आणि रांगोळी तयार करायची.
मग खाकी कागद आणून बरोब्बर आखून अगरबत्तीने ठिपके काढायचे, हे काम मोठा भाऊ करायचा.
बाजारातून पण रांगोळी, रंग आणि
रांगोळी चमकण्यासाठी ....
झिग- चमचम आणायची
गेरू हवाच.....
मापाने जमीन गेरूने सारवायची.
आणलेले रंग हिंगाच्या छोट्या डबीत भरून ठेवायचे.
अशी पूर्व तयारी करायची.
रांगोळी काढतांना रेघ नाजूक व सरळ काढायची.
रांगोळीत रंग भरतांना रंगात रांगोळी नेमक्याच प्रमाणात मिसळायची.
 मग रंग भरले की ती उठावदार दिसते.
     रांगोळी काढून झाली की आजुबाजु एकदम छान स्वच्छ करायची.
आपली रांगोळी छान दिसायला हवी ना.....
मग बाकीच्या घरी कशी काढली आहे रांगोळी????
ते बघायला जायचं.
मैत्रिणीची काढायची असेल तर.... तिला विचारून काढायला, रंग भरायला मदत करायची....
घरोघरी रांगोळी काढतच असत.
कुणी रांगोळी काढणे हा सोहळा… आहे अशी रांगोळी काढत. पुढे मोठी जागा...
मग मोठी रांगोळी, आजुबाजुला भरपूर रंगांच्या पुड्या.... 
पाटावर बसून मोठी रांगोळी …!!! 
ठिपक्यांचीच, पण बघत राहावं अशी रांगोळी काढत.
जागा लहान असली तरी सहा, आठ ठिपक्यांची तरी रांगोळी काढतच.....
आता मात्र खूप बदल झाले.
मधल्या काळात स्टिकर्स आले. अगदी उंबरठ्यावर सुद्धा स्टिकर.....
मग छापाने रांगोळी, छोट्या छापापासून मोठ्या छापाच्या रांगोळ्या...

संस्कारभारती :-

जणूकाही गालीचाच अंथरलाय अशा मोठ्ठ्या रांगोळ्या, एकमेकांच्या मदतीने काढल्या जातात.
यात जेवढी जाड रेघ तेवढी चांगली
यात अगोदर  रंग भरायचे आणि मग रांगोळी रेखाटायची.
 प्रथमच ठरवावे लागते कि किती मोठी काढायची, ते आखून घ्यावे लागते.
म्हणजे जे काढाल त्यात सुधारणा करता येत नाही.
रंग सुद्धा रांगोळी मिसळून नाही. 

एक मिनिट रांगोळी :-

आता बोटाने काढायच्या एक मिनिट रांगोळ्या आल्या.
याची रांगोळी ही रंग मिश्रितच मिळते तिच वापरायची. 
आपण रांगोळीत रंग मिसळून काढली तर ती तेवढी छान दिसत नाही.


हे जरी असलं तरी, निरनिराळ्या राज्यात रांगोळी ऐवजी इतर काही साहित्य वापरून रांगोळी काढली जाते.
एक कला प्रकार- ६४ कलांपैकी - वेगवेेगळ्या स्वरूपात आपल्या समोर कल्पकतेने येतो.
* पीठ, चुना वापरून....
* सौभाग्य अलंकार वापरून,
* विड्याची पानं,सुपारी, या पुजेच्या साहित्याने
* चहा पावडर, साखर, कपबशीच्या सहाय्याने
* चमचे काटे यांच्या सहाय्याने
* फुलं पानं वापरून
* जाडे मीठ रंगवून
* पाण्यावर, तेलावर, कोळशाची पूड पाण्यावर पसरून...
* घरीच कोयरी , बदाम यासारख्या आकारावर आरसे, टिकल्या चिकटवून.
* डाळींचा वापर करून
अशा निरनिराळ्या स्वरूपात रांगोळी आपल्या समोर येते.

रंगावली प्रदर्शन .....

हे तर अनेकोनेक वर्ष भरवली जातात. लोक तिकिट काढून ती बघायला जातात.
आणि प्रत्येक रांगोळी बघून
 व्वा! किती सुंदर
अप्रतिम!
अवर्णनीय....
अशी दाद तर देतातच
पण त्या कलेला आणि कलाकाराला सलाम करतात
बाहेर पडतांना छान बघितल्याचा आनंद आणि सुरेख अभिप्रायही वहीत नोंदवतात.

(एखादा कलाकार जर तिकडे भेटला तर मग काय आनंद वर्णावा.....) 

 

 

  

संस्कार भारती 

 

 

 
 

 

 

 

 

1 comment:

  1. रांगोळी - मांगल्याचे प्रतिक, पावित्र्याचे प्रास्ताविक, प्रसन्न्तेची खूण…!!!
    रांदोळी म्हणजे भूमी अलंकरण…!!!
    ऐतिहासिक काळापासून रांगोळीचे अस्तित्व दिसते.
    संस्कृतीच्या विकासाचे प्रतिबिंबही रांगोळीत पडल्याचे प्रत्ययास येते.
    ( मी वाचलेलं,)

    ReplyDelete