Thursday, 12 November 2015

आठवणीतली दिवाळी....




माझ्या बालपणातली…!!!

माझं बालपण.....
बराsss…च काळ,
वर्ष मागे वळून बघतांना आठवते ती दिवाळी …!!!
   फटाके आणले की ते एका सुपात ठेवून उन्हात ठेवायचे.
तापवायचे, नंतर ते वाटायचे.
वसुबारस, धनत्रयोदशीला थोडे कमी फटाके वाजवायचे असं सगळं ठरवायचं. 
शक्यतो केपा, रोल वाजवायचे, किंवा लवंगी माळा सोडवून वाजवायच्या.
छोटंसं घर पण जिना उतरून खाली गेलं की छान मोकळ्या जागा चांगल्या दोन तीन...
सकाळी उठलं की मोठा भाऊ सुतळी बाँब लावायचा भल्या पहाटे ४.०० वाजता.
मग तेल, उटणं लावून आई छान गरम पाण्याने आंघोळ घालायची .
ए आई नको ना हे तेल उटणं
आम्हाला फटाके वाजवायचे आहेत
थंडी वाजतेय, पटकन आंघोळ करून फटाके वाजवायला जातो ना…!!!

सगळ्यांच्या आधी......
   आंघोळीच्या वेळी बाकीची दोन भावंडं फुलबाजी लावून त्याला दाखवायची आणि ....
दिन दिन दिवाळी
गाई म्हशी ओवाळी....

म्हणायचे,
 यावेळी रेडिओ लावलेला असायचा. छान गाणी लावलेली असायची.
     मग आम्ही तिघे आणि तिघे समोरच्या बिल्डिंगमधले असे सहाजण उजाडेपर्यंत फटाके वाजवायचो. पहिल्या दिवशी लवंगी फटाक्याची अख्खी माळ लावायची, तर इलेक्ट्रिक/डांबरी फटाके सोडवून लावायचे.
तोपर्यंत आईने बटाट्याची भाजी आणि शिरा हे दोन ताजे पदार्थ तयार केलेले असायचे, आणि मस्त फराळ
व आम्हा सहाजणांची रांगोळ्या ताटाभोवती काढुन, बैठका मांडून पंगत मांडलेली असायची सगळे मग गप्पा मारत फराळ करायचो.
नंतर न वाजलेल्या  फटाक्यांची दारू एका कागदात गोळा करायची आणि त्याची सुरसुरी करायची.
    मग आई सुंदर रांगोळी काढायची. ती बघत बसायचं
(लहान होते मी, थोडी मोठी झाल्यावर मी काढायचे, ठिपक्यांची रांगोळी)

     भाऊबीजेची तर मस्त आठवण…!!!

अशीच सुंदर पंगत व्हायची, जेवण झालं की आई मामांना ओवाळायची.
आई पाट मांडायची त्याखाली स्वस्तिक काढायची, मामा पाटावर बसतांना टोपी घालायचे.

मग आम्ही एक जण दुसऱ्याला सांगायचा की आई ओवाळत आहे मामाला, तर लाव बॉम्ब.!
मग दुसरा तिसऱ्याला सांगायचा,
मग तिसरा खाली बॉम्ब लावायचा, त्यावेळची आमची धावाधाव,
आईने औक्षण करतांना बाँब वाजला पाहिजे ही मजा वेगळीच होती.
  असं प्रत्येक मामाच्या वेळी करायचो.
(चुलत, मामे, मावस, सख्खे मिळून सहा मामा तरी असायचे)
औक्षण झालं की वडील मानाचा नारळ मानाने द्यायचे, 
मामाला कवेत घ्यायचे,
 आणि मामा नमस्कार करायचे.
     कुठले फटाके कधी वाजवायचे हे ठरवतांना सगळे बाँब मोठा भाऊ वाजवणार,
 आम्ही लहान होतो ना....
देवी बार पण असायचे ते भाऊबीज आणि पहिल्या दिवसासाठी हे ठरलेलं असायचं.
बाँब पण दोन प्रकारचे
सुतळी, खोक्यातला.
:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:

No comments:

Post a Comment