Sunday, 31 May 2015

करूया स्वागत जून महिन्याचे...


नमस्कार,

आज १ जून२०१५,
सोमवार,
आठवड्याचा पहिला दिवस.
महिन्याची सुरूवातच नव्या कोऱ्या दिवसाने सोमवारने होत आहे
आणि आता शाळा पण सुरू होणार... मोठ्या सुट्टीनंतर
     
     पालकांची मुलांची शाळेची खरेदी सुरू होईल. नव्या वस्तू, नवी पुस्तके,
 नवा रेनकोट-छत्री, पावसाळी शूज् नवा युनिफॉर्म
नवा नवा वास असलेली नवी पुस्तके,
नवे दप्तर, आणि शाळेत नवा वर्ग, आणि मोठ्या सुट्टीनंतर भेटणारे …

मित्र- शिक्षक!!!!!

     तर  बालवाडीचे शिक्षक नविन  मुलांसाठी सज्ज होणार!!!!
हे झालं शाळेविषयी ....

      आता पावसाबद्दल...

सगळेच जण या , पाऊस येणार का ७ जूनला ???
आला तर नंतर दडी नाही ना मारणार ?
या विचारात!!!!
निसर्गात मस्त बदल होणार!
कधी इंद्रधनुष्य दिसेल,
कधी धो धो पाऊस!!!!
कधी उन-पाऊस....
कधी मी येतोय , असं दमट वातावरण !
मग कुठे पाणी साठेल तर कुठे गाड्यांचा खोळंबा!!!!
* अरे छत्री नेली तर पाऊस नाही. उगाच ओझं बरोबर!!!
* तर छत्री ही हरवण्यासाठीच असते.
* अरे काल झालेल्या धुव्वाधार पावसाने आज मस्त सुट्टी.....
*  खुप पाऊस, मस्त गरमागरम कांदा भजी आणि वाफाळता चहा....
धम्माल नुसती!!!

* कुठे वर्षा सहलीचे planning....

अशा चर्चा रंगणार
     तर अनुभवूया हा जून महिना आणि गाऊया पावसाचे आवडते लहानपणीचे गाणे
(आणि होऊया लहान, सोडूया या पावसात होड्या)

     ये रे ये रे पावसा

     तुला देतो पैसा

     पैसा झाला खोटा

   पाऊस आला मोठा....



ÖöööÖ

Saturday, 30 May 2015

ताडोबा जंगल......


एक अनुभव

     २५ जानेवारी २०१५ च्या भल्या पहाटे उठून पटापट आटपून आम्ही ५.३० वाजता ride साठी जीपमधे
जाऊन बसलो. थंडी खुपच! जीप सुरू झाल्यावर तर बोचरे वारे आपलं काम करत होते.
 पण वातावरण एकदम प्रसन्न होतं.
सकाळ होत आहे- हे पक्षी सांगत आहेत,
मस्त सुर्योदय होतोय, याचवेळी आम्ही एका पाणवठ्याजवळ आलो स्वच्छ होता पाणवठा!!!!!
इतका की..... झाडांची प्रतिबिंब त्यात दिसत होती. तेवढ्यात डाव्याबाजुने एक सांबर आलं.... हळूहळू पाण्यात शिरलं आणि सावकाश पलिकडील तीरावर गेल. तर त्या सांबराचं प्रतिबिंब त्या पाण्यात दिसत होतं
     याच वेळी तिथे मोर नाचत होते, हरणं पाणी पित होती. माकडं इकडून तिकडे उड्या मारत होती....
भल्या मोठ्या रानगव्याचं दर्शनही जवळच झालं.
भारद्वाज पक्षी, एक हिरवा पक्षी, पक्षीराज गरूड, खंड्या पक्षी...अशा पक्षी आणि प्राण्यांचं दर्शन झालं,
तसंच जीपची ride असते ना तशी हत्तीची पण ride असते, तर तो हत्ती ही बघायला मिळाला.

१. हत्तीवरील ride
२. वानर
३.पक्षीराज गरूड
४.नितळ, स्वच्छ पाणवठा
५. गरूड , झाडाच्या शेंड्यावर बसला आहे.
६. हिरवे पक्षी
७.जंगलातील मस्त वाट
८. भारद्वाज
९. जंगलातला अनुभवलेला    सुर्योदय.

Friday, 29 May 2015

काही नजरेस आलेलं

निरीक्षणं

*पिंपळाला मस्त पालवी फुटली आहे, कोवळी कोवळी पानं (रंग लांबून तांबूस??? )
 लांबून फुलंच आहेत की काय असं वाटतंय
* बदामाच्या झाडाला मोहोर??? आलाय आणि मस्त बदाम लागलेत.
* जुन्या पानांवर धूळ आहे पण काही झाडांची कोवळी पालवी पोपटी रंगाची आहे.
* जांभळाममुळे रस्ता जांभळा होतोय.
* उंबर ह्या फळामुळे चर्नीरोड जवळचा पदपथ थोडा चिकट वाटतो.
* आता लॅबर्नमच्या फुलांची जागा चॉकलेटी रंगांच्या शेंगांनी घेतलीय.
पण कुठे कुठे अगदीवर मात्र अजुनही आहेत तजेलदार लॅबर्नमची फुले.
★ गुलमोहोर मात्र छान केशरी फुलला आहे.
★ कुठे कुठे बिट्टीची पिवळी फुलं मस्त दिसतात.
★ विल्सन कॉलेजच्या आवारात मस्त मस्त फुलं आहेत.
★ बिर्ला भवनमध्ये तर छानच फुलांची बाग आपलं लक्ष वेधून घेते.
★ लाल चाफा बहरलाय. सुंदरच दिसतो, पांढरा चाफा हिरव्या पानांनी पण बहरलाय आणि 

फुलांचे गुच्छच्या गुच्छ....

अहाहा!!!!!!

    आणि हो साडेसहालाच सुर्याचे दर्शन एकदम प्रखर, नुसत्या नजरेनी बघता येत नाही.
 अधून मधून   आकाशात काळे ढग दिसू लागले आहेत
 ★ फिरायला येणारा प्रत्येक जण घामाने चिंब भिजलेला !!!!

बाराखडी.....


आपली वर्णमाला!!!

आता आपल्याला कोणी म्हणालं की म्हण बरं बाराखडी ???? 
तर....
असो....बघुया
लहानपणी आपण शिकलेल्या बाराखडीचा मोठेपणी आपल्या आरोग्यासाठी कसा उपयोग होतो.
मराठीतील स्वर :
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः
वळुया वर्णमालेकडे!!!!!
     क ख ग घ ङ
     च छ ज झ ञ
     ट ठ ड ढ ण
     त थ द ध न
     प फ ब भ म
     य र ल व श ष
     स ह ळ क्ष ज्ञ
   आता क्रमाने आपण म्हणणार ......

क का कि की कु कू के कै को कौ कं कः!

याप्रमाणे पूर्ण बाराखडी म्हणायची (क ते ज्ञ) यासाठी जबडा पूर्ण उघडायचा,
 जेथे आवश्यक असेल तेथे.
     यासाठी फक्त ५ मि. वेळ लागतो. आणि चेहऱ्याला हलका व्यायाम होतो.
पण या रोजच्या सरावाने पटकन म्हणू.
* कोणती अक्षरं म्हणतांना ओठाला ओठ लागतो,
* कोणती अक्षरे म्हणतांना ओठ एकमेकांना चिकटत नाहीत,
* कोणत्या अक्षराचा उच्चार प्रयत्नपुर्वक करतो,
* अशातऱ्हेने वर्णमालेकडे बघण्याची दृष्टी मिळेल.
* नव्याने वर्णमाला अभ्यासता येईल.
* या वर्णमालेत नसलेली, पण आपण उपयोगात आणतो अशी अक्षरे,
( ॐ, श्र, त्र, हृ, ॠ ऋ. ही म्हटलं तर जोडाक्षर,बाराखडीतलीच आहेत,पण ॠषी असं लिहितो रूषी असं नाही लिहीत)
अशा गमती जमती पण कळतील.
एक अक्षरांचा वापर आपण शब्द म्हणून करतो अशी अक्षरे, शोधली जातील.
जसे की ... व, की ,हो...
आणि अजुनही पुष्कळ काही.
मी असं पुस्तक वाचलं होतं दहा-बारा वर्षांपुर्वी, ज्यात बाराखडी का म्हणायची, त्याचे फायदे काय ते लिहिलं होतं. आता सलग सांगता येत नाहीत पण बाराखडी रोज म्हणावी एवढं मात्र नक्की.

तुमची तर आधीच म्हणून झाली असेल!

हो ना......

Thursday, 28 May 2015

श्रीगुरूदेव दत्त

शुभ गुरूवार

    आजची सुप्रसन्न सकाळ!

थंड वाऱ्याच्या झुळुकांनी बाहेर पडताच स्वागत केलं.
मस्त वारा घेत, चालायला सुरूवात केली.
     ह्युजेस रोडच्या चौकात डाव्या बाजुला लक्ष वेधून घेतलं ते मधुमालतीच्या फुलांनी, लाल चाफ्याच्या फुलांनी!!!!
एकदम प्रसन्न वाटलं. येथे माड, केळी, मधुमालती, लालचाफा अशी अनेक झाडं आपले लक्ष वेधून घेतात. तर या हिरव्यागार गर्द झाडीत पांढऱ्या रंगाचं, दर्शनी भागात सुंदर नक्षीकाम असलेलं कौलारू मंदिर आहे....

श्री गुरूदत्तात्रेयांचं!!!!!

हे वर्षातून एकदाच, दत्तजयंतीला सर्वांना दर्शनासाठी खुलं असतं!!!!
हे आता हेरिटेज आहे.
     हे दाभोळकरांचे दत्त मंदिर आहे.

येथील दत्तात्रेयांचे दर्शन मनाला शांती देते.

सुंदर मंदिर, प्रशस्त सभागृह, ऐसपैस गाभारा, सुंदर देव्हारा, देव्हाऱ्यातील फुलांची आरास, 

आणि देव्हाऱ्यातील श्रीदत्त!!!!!

    
तर या मंदिराचा मोठा दरवाजा जो वर्षातून एकदाच उघडतो, 
त्या दरवाजाला रोज लोक भक्तीभावाने नमस्कार करून पुढे जातात.

ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं

 

 

 

 

Tuesday, 26 May 2015

प्रत्यक्ष वाघ बघितला....

ताडोबा.....
     २६ जानेवारी २०१५ ची मस्त सकाळ...सकाळ कसली भली पहाटच होती ती!!!!!
थंडी मी म्हणत होती. काळोख.....
आणि ताडोबाचं जंगल....
पण खराखुरा वाघ दिसण्याची उत्कंठा या सगळ्यावर मात करत होती.....
     बरोब्बर ६.०० वाजता गेट्स उघडली आणि आमची जीप वेगळ्याच दिशेने धावू लागली....
 अचानक जीप आत शिरली, तर तिथे छोटसं मैदान होतं, गाईडने उभं राहून वाघ तिथे आहे का बघितलं, पण.... तो तेथे नव्हता. मग पुढे मार्गक्रमण करता करता उजव्या हाताला पाण्याचा आवाज येऊ लागला. पण तेथेही वाघ दिसला नाही. आज आमची तिसरी आणि शेवटची ride होती...
 कालच्या आमच्या एका जीपला संध्याकाळी माया वाघीण दिसली होती.
 पण.... आमची जीप पोहोचायला मात्र ५ मिनिटे उशीर झाला होता. आणि आम्हाला तिच्या ओल्या पायांच्या ठशांवर समाधान मानावे लागले होते. असो
       तर आम्ही पुढे जाऊ लागलो, जंगलातील काही महत्त्वपूर्ण माहिती गाईड आम्हाला देत होते.
आणि जिथे वाघ दिसू शकेल असे त्यांना वाटत होते त्या ठिकाणी आमची जीप धावू लागली....

ठिकाण: 97 waterhole

पाणी पिण्याचे ठिकाण येथे आलो. 
आणि नेहमीप्रमाणेच बातमी- ५ मि. पुर्वी माया आली होती.
२ मिनिटेच आमच्या गाईडने अंदाज बांधला आणि ड्रायव्हरला सुचना दिली की, गाडी आत पाणवठ्यावर घे. त्याप्रमाणे जीप पाणवठ्यावर घेतली... तर तेथे अजून २ जीप उभ्या होत्या. ५ मि. वाट बघितली. तोपर्यंत ८.३० वाजत आले होते.
आणि.....
आलाच तो क्षण!!!!!

माया   डाव्या हाताच्या झाडीतून मस्त चालत येत होती......डौलदार, ऐटदार ताडोबाच्या राणीची चाल...

(मी हा क्षण टिपण्यासाठी मोबाईलवर clip घेण्यासाठी तयारीतच होते लगेच clip घ्यायला सुरूवात केली, आणि कॅमेरावर फटाफट फोटो काढले आमच्या गाईडने)
     तर मायाने पाणी प्यायला सुरूवात केली. पाणी पिता पिता आमच्याकडे मस्त "लुक" दिला, आणि परत पाणी प्यायला सुरूवात केली. बरोब्बर ८ मिनिटे ती पाणी प्याली आणि आपल्या वाटेने मस्त डौलदार चालीने, मी या जंगलची राणी या दिमाखात, अगदी आमच्या गाडीजवळून उजव्या बाजूने झाडीत गेली.
     आणि परत गाईडने सुचना दिल्यानुसार जीप बाहेर आली, सगळ्या जीप तेथे गोळा झाल्या होत्या.
     सांबर तेथे 'कॉल' देत होते ना!!!!!!
तर ....पुन्हा "माया" दिसली. मस्त वेगळ्या 'पोज' देत होती, लोक फोटो काढत होते. हे जवळजवळ १०मिनिटे सुरू होते. मग मात्र ती शांतपणे, एखादा व्रतस्थ चालतो त्या चालीने आत आत जंगलात गेली, जेथे जीप्स जाऊ शकत नाहीत.

ते "तिचं" चालणंसुद्धा अजुनही नजरेसमोर आहे......

  माया वाघीण वय वर्ष ५
वेळ : सकाळी ८.३०
दिनांक : २६.१.२०१५
ठिकाण :ताडोबा जंगल
 वाघाला बघून लोक का घाबरतात??
तिचं दिसणं एकदम शांत!!!
त्यामुळेच आम्ही उघड्या जीपमधे असुनही घाबरलो नव्हतो बहुतेक.....





१. माया पाणी पिऊन निघाली. थोडी पूढे आली.
२. सांबर कॉल नंतर दिसली
३. संध्याकाळी एका जीपला दिसली.
४. Waterhole कडे येतांना
     डावीकडून
५. संध्याकाळी दिसलेले ओले पावलांचे ठसे.
६. पाणी पिऊन निघाली..
७. बाहेर आल्यावर
८. ती निघाली.....
९. अगदी गाडी जवळून जातांना, अगदी उजवीकडे

Monday, 25 May 2015

छंद



आपली आवड.....

प्रत्येकाला काहीना काही गोष्टींची आवड असते.

  आणि काहींचा छंद जडतो.

     लहानपणी काही छान दिसलं की ते आपल्याजवळ हवं असं वाटतं.
त्यातुनच स्टँप गोळा करणे, क्रिकेटर्सचे फोटो गोळा करणे, पिसे गोळा करणे, नाणी गोळा करणे, छोट्या गाड्या गोळा करणे, हे असे अनेक छंद मुलांना जडतात.
तसंच व्यक्ती नोकरी-व्यवसायात असतांना बरेच वेळा सांगितलं जातं की सेवानिवृत्तीनंतरचा वेळ छान जाण्यासाठी एखादा छंद जोपासा, म्हणजे तो काळ पण मजेत व्यतीत होईल.
भेट पाकीटे तयार करणे, टाकाऊ वस्तुतून छान वस्तू बनवणे, जुन्या रेकॉर्ड जतन करणे, छान पदार्थ बनवणे-खाणे व खाऊ घालणे, जे उत्तम असेल त्याला दाद देणे, मित्र मैत्रिणींना मदत करणे, संस्थांना मदत गोळा करून देणे,
वर्तमान पत्रे,मासिके, यातील कात्रणे वहीत चिकटवणे,
फोटो काढणे,
फळांच्या बिया गोळा करून बाहेर कुठे जातो तेथे मोकळ्या जागी टाकणे,
डायरी लिहिणे,
हे आणि असे मस्त छंद आपल्याला असतात.
     आपल्याला असा कोणतातरी छंद असेलच!
तर सांगा कोणता छंद आहे आपल्याला!!!!!

आणि माहितीत कोणाला वेगळाच छंद असेल तर तोही सांगा

Sunday, 24 May 2015

चला सुर्योदय बघायला....


मॉर्निंग वॉक सुरू करायचं आहे का ?????
चला तर.......
     रात्री झोपतांनाच निश्चय करावा. सकाळी जाग आली की अंथरुणात न रेंगाळता पटकन अंथरुण सोडावे.
      फिरण्यासाठी खास कपडे, बूट- मोजे खरेदी करावेत व ते वापरावेत.एक वेगळाच उत्साह वाटेल...
      आपले जे श्रद्धास्थान असेल तेथे बोलावे की मी रोज मॉर्निंग वॉकला जाणार आहे. म्हणजे बोलल्याप्रमाणे वागावे असे वाटते.
फिरायला गेल्यामुळे मिळणाऱ्या सुखाचा मनात विचार आणावा-
मोकळ्या हवेत जायला मिळेल...
निसर्गात घडणारे बदल दिसतील.....
अनेक वेगळ्या व्यक्ती दिसतील.....
दररोज सुर्यदर्शन होते....
ताजी फुलं दिसतात.....
मनात छान विचार येतात...
स्वतःला स्वतःबरोबर गप्पा मारता येतात.....
(दिवसभराच्या कामाचं वेळापत्रक आखता येईल)
तब्येत चांगली राहिल......
स्वतःला एक छान शिस्त लागेल.....
एखाद्या वेळेस छान मित्रांचा ग्रुप होईल- सहल, एकत्र जेवण, छान विचारांची देवाण-घेवाण होईल.....
सर्वात महत्त्वाचे.... शारिरीक व मानसिक आरोग्य चांगले राहिल.
मग कधी पासून करताय सुरू.......मॉर्निंग वॉक!!!!!
ःःःःःःःःःःःःःःःःःः

कंटाळा आला तर......

काम करता करता कंटाळा आला तर...... 

कंटाळा आला, थकल्यासारखे वाटले तर थोडे पाणी, सरबत, ज्यूस, सूप प्यावे.
बऱ्याच वेळात काही खाल्ले नसेल तर काहीतरी खावे.
डोळे मिटून २ मि. स्वस्थ बसावे.
चार-पाच दीर्घ श्वास घ्यावेत.
आळोखे- पिळोखे द्यावेत.
आवडतं गाणं ऐकावे.
आवडत्या व्यक्तीला फोन करावा.
(त्या व्यक्तीला कल्पना द्यावी की मला कंटाळा आलाय म्हणून तुला फोन केला आहे.)
घरात असाल तर गॅलरीमधे यावे, मोकळी हवा मन प्रसन्न करते.
घरी असाल तर थोडावेळ आडवे पडावे.
तोंडावर गार पाण्याचे हबके मारावेत, डोळे पाण्याने धुवावेत. किंवा.....
दोन्ही हात एकमेकांवर घासून ते हात चेहऱ्यावरून फिरवावेत.
ताजी फुलं असतील तर त्याकडे पहावे.
जर चहा, कॉफी पिऊन बरं वाटत असेल तर ते प्यावे.
(असंच तुम्ही पण काहीतरी करत असाल, तर सांगा..)

काही शब्द वेगळेच उच्चारले जातात......

काही शब्द वेगळेच उच्चारले जातात......

इडली-इटली
मेदूवडा-मेंदूवडा
बाकरवडी-भाकरवडी
वेखंड-एखण
इस्त्री-इस्तरी
कॉफी-काफी
बोरीवली-बोरोली,बोरेवली
कांदीवली-कांदवली
चिकट-चिटक
चप्पल-चंपल
चव्वेचाळीस- चवरेचाळीस
केस विचरले- केस उगवले
पेन घेतलं- पेन घेतला
आपण केळं असं म्हणतो तर काही केळ असा उल्लेख करतात.
तसं एक वाक्य- काय भयानक सुंदर दृश्य होतं!!!
भयानक सुंदर!!!!!
तसं नुसतं सव्वा म्हणतात तर काहीजण सव्वाएक असा उल्लेख करतात
अडीच पण असंच- साडेदोन म्हणतात.

Thursday, 21 May 2015

झुकु झुकु झुकु अगीन गाडी


झुकु झुकु झुकु अगीन गाडी!    

असा आवाज सुरूवातीला गाडीचा येत असे, इंजिन वाफेचे, डबे कमी असलेली गाडी, सगळ्यांचे आकर्षण होती.
या झूक् झूक् गाडीत बसून मामाच्या गावाला जाणारी मुलं सिनेमात बघितली होती
आणि आज....

झटक् झटक् झटक् झटक् 

म्हणत मुंबईच्या नीला रोहीणी धावत आहेत,
(आता रेल्वे विजेवर धावणाऱ्या तर आवाज पण वेगळा येतो.)
प्लॅटफॉर्मवर उभे असलेले प्रवासी, गाडी वेळेवर येईल ना, मस्टर मिळेल ना, या चिंतेत असलेले प्रवासी!!!
तर हा प्रवास सुखकर व्हावा, गाड्या वेळेवर,सुरळीत धावाव्यात म्हणून काम करणारे कष्टकरी!!!!!
(त्यातील आपल्याला दिसणारे कष्टकरी)
रूळांखाली जी खडी घातलोली असते ती गाडीच्या धडकण्याने हलत असते. त्यामुळे रूळ सैल होतात, तर ते नट-बोल्ट घणाने ठोकणारे लोक, आणि खडी पुन्हा त्या पट्ट्यांवर ओढणारे लोक, हे सहज नजरेला दिसणारे दृश्य!!!!
तर हे लोक दिवसा काम करतात, खुप असणारं उन, हातात असणारं वजन, आणि सगळं काम पायी पायी!!!!!
(सध्या उन, नंतर पाऊस)
बरं या कामात चहा प्यावा, थंड प्यावं असं वाटलं, भूक लागली, चक्कर आली तर जवळपास काहीही नाही. आडोसा, सावली काहीच नाही, पुन्हा काम महत्वाचं, पण वेतन कमी, जबाबदारी अधिक! जरी यासाठी फार मोठं शिक्षण नको तरी ताकदीचं. लोकांच्या नजरेसमोर काम करून देखील हे लोक दुर्लक्षित!!  
      असो, प्रवासाच्या दरम्यान सहज दिसलं, तुमच्याबरोबर शेअर करावंसं वाटलं!
-------------------------------------------------

बदाम,


 

 समुद्रकिनारी जशी माडाची मस्त झाडं आहेत ना, 

 तशी बदामाची पण मस्त झाडं आहेत. 


 झाडाची रचना पण मस्त 







तर,.. आज या विषयी, बेताची उंची असलेली पण सुंदर हिरवी मोठी पानं, त्याहीपेक्षा सुंदर असं बदामाची फुलं आपलं लक्ष वेधून घेतात.
झाडावर असली की फुलाच्या कडेला असलेला गुलबक्षी रंग छानच दिसतो, तेवढ्यात झाडावरून फुल खाली पडलं!!!!!
किती सुंदर फूल! फुलाच्या पाकळ्या म्हणजे काड्याकाड्याच असतात. खाली पांढरा आणि वर गुलबक्षी त्यावर पिवळसर ठिपका, मस्तच असतं हे फुल!! पण खाली पडलं की लगेचच ते विस्कळीत होतं. सगळ्या पाकळ्या/ काड्या वेगळ्या होतात. या फुलाला मात्र एक वेगळाच वास असतो.  हे फूल क्वचित अखंड असतं पण हात लावताच विस्कळीत होतं.
प्रत्येक झाडाखाली फुलांचा सडा, आणि वातावरणात या फुलांचा वास...

आता या फळाविषयी,

झाडवरून खाली पडलेली लाल फळं बघायला मिळतात.(मुलांना खुप आवडतात)
तर बाजारात हिरवे बदाम. हाच सिझन ओले बदाम खाण्याचा!!!
तर पुजेसाठी कठीण कवच असलेले बदाम,
लहानमुलांना उगाळून देतो ते बदाम, एक सुकामेवा,
 भिजवून काप करून शिऱ्यात घालतो,
 नुस्ताच बदामाचा शिरा करतो,
 बर्फी सजवण्यासाठी बदामाचे काप.....
कितीतरी ठिकाणी वापरतो आपण बदाम आणि या फळाचा आस्वाद घेतो.
     रोस्टेड बदाम, खारे बदाम तर चणे-दाणे खातो तसे खाल्ले जातात.
पण ......

ओले बदाम खाण्याची मजा काही वेगळीच!!!!!




कालाय तस्मै नमः !!!!


असंच असतं.....

     बाळाचा जन्म होतो. जिकडे तिकडे आनंदी आनंद होतो. हे बाळ फक्त आईलाच ओळखतं. मग ते आईवर प्रेम करायला लागतं. कुणी काहीही दिलं तरी ते आईच्या कडेवरून खाली उतरत नाही.
 (आमचे शेजारी याला सिंहासन असं म्हणायचे, ते म्हणायचे आत्ता हजार रु. द्या नाहीतर सोन्याचा गोळा काहीच फरक पडणार नाही.)
     मग हे बाळ थोडं मोठं होतं मग थोडं आईपासुन दूर जातं. त्याला खेळणी आवडू लागतात. आई मग ये , हा खाऊ घे. असं आमीष पण दाखवते पण ते खेळण्यात रमतं.
     जसा शाळेत जातो तसा पुस्तकांवर, शाळेतल्या सवंगड्यांवर प्रेम करू लागतो.
     मग अजून थोडा मोठा झाल्यावर मित्रमंडळी आवडू लागतात. त्यांचा पगडा जास्त असतो. मित्रांना काही बोललं तर याला राग येतो. कॉलेजमधे गेल्यावर डीग्री मिळते. मग नोकरी/ व्यवसाय करू लागतो.
मग लग्न !!!!!
जोडीदारावर प्रेम करू लागतो. मग आईकडे दुर्लक्ष!!
     आईमात्र आपल्या मुलाला समजून घेते.
(इथे बाळ म्हणजे मुलगा किंवा मुलगी असं आहे).
एकजण बोलता बोलता म्हणाले होते, की जनरेशन गॅप दर १५/२० वर्षांची असते. यावेळी मुलांना आपल्या आईवडिलांची मतं वेगळी वाटू शकतात)
     तसंच ते म्हणाले होते की ३० वर्षांनी वेगळे लोक भेटतात आणि ते लोक आवडतात.
 तर हे निसर्गाचं चित्र आहे ते असंच फिरत राहणार, यात बदल होणार नाह
कुठे मुलं दूर जातील, कुठे आई वडिलांना दूर ठेवतील, कुठे एकत्र राहतील पण बोलायला वेळ नसेल.

कालाय तस्मै नमः। हेच खरं

Tuesday, 19 May 2015

कष्टकरी


    
     सकाळी बाहेर पडले तर वाडीतलं झाड धुळीने भरलं होतं!!!!!
मग बाहेर प्रत्येक झाड बघायचा नाद लागला तर बहुतेक प्रत्येक झाड धुळीने भरलंय!!!!!!
     मग लक्षात आलं , मधून मधून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळका, बरोबर माती घेऊन जातांना दिसतात ना त्या झाडावर बसते ती माती.
     आणि जिकडे तिकडे रस्त्यांची कामं सुरू आहेत.
पावसाळ्याची तयारी जोरात चालू आहे.

तर.... याविषयी

     हे काम करणारी माणसं रात्री काम करतात.
कोणताही आवाज नाही, गडबड नाही, दिलेलं काम निमुटपणे चालू असतं.
तसंच काही ठिकाणी दिवसा काम करतात. आपल्याला बाहेर उन्हाकडे बघवत नाही आणि ही लोकं उन्हात काम करतात, घामाच्या धारा वाहत असतात, हातात वजन, कुदळ-फावडं, गरम डांबराशी संबंध, बापरे!!!!
     बरं हे काम बायकापण करतात. तेव्हा त्यांची अगदी लहानमुलं बाजुलाच पाळणा, झोळी केलेली असते त्यात ठेवतात, थोडी मोठी मुलं बाजुलाच खेळत असतात!
     बरं हे काम खुपच कष्टाचं
एक घमेलं उचलतात ना.... ते किती जड असतं.... नुसती कल्पना केली तरी कठीण किती आहे ते समजेल.
     ना कोणी कौतुक करत!
ना कोणी चहा, थंड विचारत!!!
ना कोणी बक्षीसी देत!!!
ना चांगलं वेतन!!!!
मान तर नाहीच या माणसांच्या नशीबी!!!!!
उलट हे लोक व्यसनी असतात म्हणून हेटाळणीच!
     असो, झाडावर बसलेल्या धुळीमुळे का होईना या कष्टकरी लोकांबद्दल थोडा विचार करता आला.
--------------------------------------------------

आपल्या मोबाईलमधे कोणाचे नंबर असावेतच.......


* जे नबरं नेहमीच लागतात असे नंबर

* डॉक्टर- फॅमिलीडॉ., ऑरथोपेडिक डॉ,  हार्ट डॉ., लॅब चे नं
* मेडिकल स्टोअर्स,
दिवस-रात्र केमिस्ट
* ब्लडबॅकेचा नंबर
* अँब्यु़लन्स नं.
* LIC, mediclaim एजंट
* भाजी घरपोहोच करणारे
   किराणा सामान घरी आणून देणारे......
* हॉटेल्स-फ्रीहोम डिलिव्हरी......
आणि
      जे घरी आणून देत नाहीत त्यांचे पण हवेत, त्यांना फोन करून ठेवला आणि
 मग आपण आणायला गेलो तर वेळ वाचतो.
* आपले नेहमीचे सोनार, शिंपी, भेळवाला,......
* मुलं, नातवंड जर ट्यूशनला जात असतील तर
 त्या ट्यूटरचे, शाळेचा नंबर नोंद करावा.
* कामाला येणारे आपले मदतनीस- धुणीभांडी, केरलादी करणारी,
 गाडी मोटार धुणारा, घरी स्वयंपाक करायला येणारे महाराज.
* मित्रमैत्रीणी, नातेवाईक यांचे नंबर तर आपण नोंद करतोच,
पण.....
 कुठे गेलो तर कुणाचा तरी नं. महत्वाचा वाटतो, त्याची नोंद करतो तर ती कोणत्या संदर्भात ते पण लिहावे.
* आकाशवाणी केंद्र, जर आपण कार्यक्रम ऐकत असू तर, मत नोंदवता येतं.
* काही संस्था, ज्याचा आपल्याबरोबर संबंध येतो. 
उदा. वात्सल्य ट्रस्ट, आनंदवन इ.
* सहलीला जातो, तर ट्रॅव्हल सर्व्हिसेस, गाडी भाड्याने देणारे......
* सहलीत भेटणारे पर्यटक
* मुलांचे मित्रमैत्रिणी,
* आपले शेजारी
* भटजी / पौरोहित्य करणारे
* ऑफिसमधले सहकारी
* बँकेचा हेल्पलाईन नं.
बँकेच्या ज्या शाखेत आपलं खातं असेल तेथील नं.
* just dial किंवा जे online service देतात त्याचे नं
* आपण ज्या ठिकाणी सहलीला जातो त्याठिकाणी कुणाचे तरी नातेवाईक,मित्र असतील तर त्यांचे नं घेऊन ठेवावेत.
अजुनही खुप जणांचे नंबर आपण नोंदवतो,
 पण ते कशासंदर्भात, कुठे राहतात, ई.मेलआयडी सह, वाढदिवसाच्या नोंदी,
घरचा, मोबाईलचे २-३ नं. असल्यास, ते आपण नोंदवू शकतो.
-----------------------------------

लाखमोलाची दवा.....


पण मोफत.....

संत कबीर म्हणतात....

(स्वमुत्रासंबंधी)
काया अमरी नासै रोग।
पाकी अमरी साधै योग।
कहे कबीर अमर भाई काया
जिन भेद अमरी का पाया।।
    

     या संदर्भात माझ्या मैत्रीणीचा एक अनुभव सांगते.

या माझ्या मैत्रीणीला अंथरूणात स्वतःचं स्वतःला वळता पण येत नव्हतं, खूप उपाय केले दुखणं वाढतंच गेलं, खूप हैराण झाली. मग तिचे वडिल तिला म्हणाले स्वमुत्र अंगाला लाव, एक तास लावून थांब.(तिचे वडिल १५ वर्ष मधुमेहासाठी प्राशन करत होते आणि शुगर लेव्हल पूर्ण कंट्रोल मधे)
तर..... तिने हा प्रयोग करायचं ठरवलं. आणि १ महिन्यातच उत्तम result दिसून आला.

*आता अजून एक रेल्वेत ऐकलेला.....

अगं, तुझ्या गालावर काळे डाग आहेत, तू मी सांगितलेला उपाय केला नाहिस ना... फुकट आहे ना, स्वतःपाशीच आहे ना
म्हणून करत नाहीस....
त्यावर दुसरी म्हणाली, मी केला तर माझा अनुभव बघ किती छान आहे.

*अजून एक .....

एक ओळखीचे काका, आमच्या लहानपणी चप्पल लागली, खरचटलं तर म्हणायचे... सकाळी उठल्या उठल्या 'करशील' ना तर धार सोड त्यावर!!!!
खरंच डॉ.कडे जाण्याची गरज नसायची.
तर दोस्तांनो, शरीराला वर लावण्यासाठी तरी हा उपाय श्रद्धेने करायला काय हरकत आहे?????
-------------------------------------------------
१५ मे महाराष्ट्र टाइम्समधे यासंबंधी लेख आला आहे.
(सगुण-निर्गुण हे सदर येतं
त्यातीलच हेडिंग आणि कबीर दोहा घेतला आहे)
बाकी अनुभव हे स्वतः ऐकलेले, शेवटचा अनुभवला आहे)
     याबद्दल पुस्तकं आहेत.
माजी पंतप्रधान, जाहीरपणे सांगत असत.
-

Saturday, 16 May 2015

Evening walk....


एक सोहळा.....

     ठरलेल्या वेळी, दररोजच एक व्यक्ती दिसते. त्या व्यक्तीचा पेहराव खुपच सुंदर असतो.
     सर्व काही परफेक्ट मॅचिंग
जर जर्सीमधे हलका पिवळा रंग असेल तर बूट, मोजे यात सुद्धा तो रंग असणारच!!!
आणि हो.......
     पावसाळ्यात छत्री असते ना हातात तर ती पण मॅचिंग!!!!!
मस्त वाटतं.
बहुतेक सर्व रंगांचे कपडे आहेत त्यांच्याकडे.
आणि वय ???
 जवळपास ७०असेल.
     खरोखरच ही व्यक्ती फिरणं हा सोहळा मानत असावी नाही का ?????
आम्ही यांना मॅचिंग आजोबा म्हणतो, आज कोणता असेल बरं रंग???
     असा विचार आमच्या मनात असतो, ते दिसले की आम्हालाच सुप्रसन्न वाटतं!!!!!
गेली २ वर्ष तरी मी त्यांना बघत आहे. पण तसंच मस्त व्यक्तीमत्व.

 फिरणं एक सोहळा मानत असतील का?

भेट पाकिटे


  भेट पाकिट देताना 

* हल्ली सुंदर सुंदर भेट पाकिटे मिळतातच तरी पण थोडी कल्पकता असेल तर साधं पाकिट सुद्धा मस्त होईल.
* काही मासिकात छान चित्र येतात ती चिकटवू शकतो.
* स्केचपेनने चित्र काढू शकतो.
(मी एका छोटीला पाकिटावर आईस्क्रिम कोनाचं रंगीबेरंगी चित्र काढून पाकिट दिलं,
 तिच्या चेहऱ्यावर मस्त आनंद दिसला)
* आतमधे पैसे भरतांना कसेतरी भरू नये, जमल्यास कोरे,सरळ असतील तर मस्त!!!!
* देवाजवळ ठेवलेले पैसे असतील तर अजूनच छान.
* विशिष्ट वाढदिवस असेल तर वाढदिवसाच्या तारखेची नोट मिळते ती द्यावी.
* अधिक महिन्यात मुंज झालेल्या मुलाला दक्षिणा द्यायची असेल तर थोडी कल्पकता वापरून द्यावी.
* एखाद्या वेळी पाकीट न देता बटवा वापरावा. ते पण देता-घेतांना छान वाटतं.
* पन्नास,साठ असा विशिष्ट वाढदिवस असेल तर ५ किंवा १० रु. ची नाणी एकत्र करून चॉकलेट सारखे पॅक करावेत.
* पाकिटावर नाव लिहितांना
स्वच्छ, सुंदर अक्षरात लिहावे.
चिकटवतांना पैसे चिकटणार नाही याची काळजी घ्यावी.
* आपल्याला पाकिट द्यायचे आहे हे जर आधीच माहित असेल तर आधीच भरावे, घाईत कसेतरी भरू नये.
* हल्ली अाहेर घेत नाहीत तर पाकीटात एखादा विशिष्ट आठवणीचा फोटो, एखादी आठवण-लेख, काव्य असं देऊ शकतो. किंवा फोटोचं ग्रिटींग बनवून देऊ शकतो.
* हे असं सुंदर पाकीट, त्यावरील ही कला , आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीला देऊ शकतो. ( ज्याने आपल्याला दिलंय त्या व्यक्तीचा उल्लेख जरूर करावा)
* "महत्वाचं" या पाकिटावर नाव घालू नये
पाकिटात नावाचा कागद ठेवावा.
* काव्य, लेख लिहायचा असेल तर हल्ली सुंदर, कागद मिळतात, त्यावर लिहावे.
( शक्य असल्यास.....)

* जसं आपण दुसऱ्याला चांगलं दिलं तर दुसरा पण आपल्याला चांगलंच देतो.

या अशा आठवणी नंतर पुन्हा पाहता येतात त्यातून आनंद मिळतो.

Friday, 15 May 2015

पण वेळ कोणाला ????


वैशाख वणवा......

उन्हाळा सुसह्य करण्यासाठी निसर्ग सुसज्ज आहे.
* आणि आपणसुद्धा....
* बाजारात खास उन्हाळ्यासाठी मस्त कपडे आले आहेत.
* लग्न, मुंज यासारख्या समारंभांमुळे नातेवाईक, मित्रमंडळी भेटताहेत, गप्पा गोष्टी होत आहेत, मस्त!!!
* भर दुपारी सुद्धा मस्त वाऱ्याच्या झुळका येत आहेत.
(पण पंखा, AC आहे ना)
आणि बाहेर पडलो तर AC गाडी!!!!!
* कोकीळ पक्षी मस्त गातोय!
* मोगरा सोनचाफ्याचा सुगंध!
* बाहेर पडलो तर...
पांढरा चाफा, लॅबर्नमची फुले- २,३ रंगात, बोगनवेल अनेक रंगात बहरलीय, गुलमोहोर,.... ही फुले स्वागत करतात.
कुठे कुठे आंबे दिसतात झाडावर.....मुंबईतच बरं का
(Big bazar कडे जातांना वळणावर जाऊन बघा)
* फळाममध्ये खास उन्हाळी फळं - फळांचा राजा आंबा, फणस, जाम, जांभूळ, करवंदे, कलिंगड, ताडगोळे, आवळे...... आहेतच.
* माठातले थंडगार पाणी- खास वाळा घातलेले, कोकम, लिंबू, जिंजर लेमन, आवळा सरबत, कैरीचे पन्हे.....
* जेवणात... सोलकढी, चिंचेचे सार, कैरीची कढी, .....
आंब्याचा रस, फणसाची भाजी,
तसंच मधे मधे खायला  फणसाची इडली, आंबे, फणसाचे गरे, फणसाचे तळलेले गरे, काजू, आंबा-फणस पोळी., फणसाची सांदणं......
* घरामधे जमलेली भावाबहिणींची मुलं, नातवंड त्यांच्याबरोबर खेळतांना आपण सुद्धा लहान होऊन जातोय.
* सहलीला जाऊन नवी ठिकाणं,तिथला निसर्ग पाहू.
* खास पावसाळ्यासाठी पदार्थ करतांना होणारी तारांबळ, .......
* खास उन्हाळ्यासाठी पोहायला जाणं,
पोहायचं शिकायचं राहिलं असेल तर १५ दिवसांचं शिबिर आहेच,
* आणि या सगळ्याचा आस्वाद घ्यायचा तर ही मोठ्ठी उन्हाळ्याची सुट्टी आहेच की... कुठलीच घाई, गडबड, टाईमटेबल नसलेली सुट्टी !!!!!!!!

* आणि हो आलाच की  पावसाळा जवळ......

कशावरून काय विचारता!!!!!
* खुप उकडतंय, किती हा उन्हाळा असं बोलायला लागलेत लोक!!!!!
* कावळ्यांनी घरटी बांधायला घेतली आहेत,   
* संध्याकाळनंतर पंखवाल्या मुंग्या येऊ लागल्या की दिव्याजवळ!!!!!
म्हणता म्हणता उन्हाळा संपत आलाय.......

तेवढ्यातच उन्हाळी निसर्गाची मजा अनुभवूया !!!!

....................................

Whatsapp....


 माझ्या नजरेतून...

     आज असं वाटलं की ज्या माध्यमामुळे आपला संवाद सुरू आहे त्याबद्दलंच बोलावं
तुमचं मतही जाणून घ्यावं!!!!
* यामुळे मला सर्व वयोगटातले friends मिळाले
(मला हे नातं खुप जवळचं वाटतं / आवडतं)
* कोणाला शाळा कॉलेजमधले मित्र-मैत्रिणी भेटतात.
* मनात कोणताही विचार आला तर तो लगेच व्यक्त करता येतो.
     यासाठी friend समोर असलाच पाहिजे असं नाही.
* निरनिराळ्या विषयांवरील विचार, माहिती आपल्या पर्यंत पोहोचते.
* मला तर यामुळेच मराठीत टाईप करायला यायला लागलं
* सोप्या पद्धतीने voice पाठवता येतं.
* फोटो तर पटकन पाठवता येतात.
* सुप्रभातच्या रूपाने सकाळीच आपली आठवण कोणाला तरी आहे, आणि आपल्याला पण सगळ्यांची आठवण येते.
* प्रत्येकाकडे काहीना काही कला असतेच, पण त्याचे फोटो माहिती या माध्यमातून मिळाली.
* आपलेच friends मस्त reply देतात, स्वतःच्या शब्दात, स्माइलीजच्या रूपात. मस्त वाटतं.
* पाश्चात्य लोकांचे विचार आपल्या पर्यंत येतात. सर्वच पुस्तक आपण वाचत नाही पण त्यातील महत्त्वाचे आपल्यापर्यंत पोहोचते.
* छान छान पुस्तकांची यादी, सरकारी योजना, ATM ने पैसे काढतांना घ्यायची काळजी, टॅक्सी प्रवास कसा कराल, इ.इ......याची सुंदर माहिती मिळते.
* बनवलेले छान पदार्थ, केलेली खरेदी, किंवा याची खरेदी करू का? हे काही क्षणातच येतं आपल्या पर्यंत!
मला तर हे माध्यम खुपच आवडतं

तुमचं मत पण सांगा हं!!!!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आता या मला आलेल्या प्रतिक्रिया

हे म्हणजे सुंदर मांडलेलं मत. .... whatsapp!!!!.

* नवीन काय? या उत्कंठेने पहावयाचे ते whatsapp!!!!.
* दूर शरिरे पण जवळ मनेंही अशीच अवस्था.
* फायद्या तोट्याचा, वेळेच्या अपव्ययाचा विचार न करता, उपयोगिते वर चर्चा न करत बसता, एकमेकाशी  मनसोक्त  गप्पा करण्याचे अमोल साधन.
* कुठेही असलो तरी लिंक मध्ये राहून,एकटेपणा, रिकामेपण भरून काढणारे साधन,
* मोकळेपणी विचार मंथनाकरिता हक्काचे व्यासपीठ .
* योग्य अंतर ठेवून अनेक ग्रूपवर मैत्रीचे  योग्य संबंध ,

* आधाराचा हात, मायेची साथ,बंधुत्वाची साद,असे whatsapp घराघरात.

--------------------------------------------------

आणखीन एक प्रतिक्रिया.....

> या माध्यमामुळे लहानमोठे, लांबचे जवळचे सार्‍यांशी पटकन संपर्क साधता येतात.
> पण विचारांची देवाणघेवाण, नवनवीनमाहिती मिळते.
> तसेच नवीन दोस्त मंडळी मिळतात.
गुडमाॅर्निंग  करताना गुडनाइट करताना विविध images पाहून निसर्गाच्या सान्निध्यात केव्हा पोहोचतो ... आणि नेत्रांना मिळणारे अवर्णनीय सूख नकळत देऊन जातो  .
> मन कसं हे पाहून प्रसन्न होऊन जातं.
सारा दिवस त्या आनंदात केव्हाच संपतो.
आणि अधून मधून व्हाॅट्सअप कडे वळतो....

अधूरं काम परत पूर्ण करतो.

 

 

 

 

 

Tuesday, 12 May 2015

मातृदिन


आई......घराघरातील ईश्वर....

     लहान मुल जेव्हा प्रथम आई म्हणतं ना तेव्हा त्या माऊलीला आकाश ठेंगणं होतं. मुल जेव्हा आईच्या कडेवर असतं तेव्हा त्याला कितीही आमिषं दाखवली तरी ते कडेवरून उतरत नाही. चालू लागतं तेव्हा ते आईचा पदर सोडत नाही. पदरामागे लपतं!!!! मग लिहायला शिकतं .. .तर श्रीकारानंतर
अ आ ई.... हेच शिकवलं जातं!!!!!
भीतीदायक, दुःख दायक घडलं तर
"आई गं" हेच उदगारर येतात.
      विवेकानंदांनी आईचं महत्त्व सांगतांनाची गोष्ट सर्वांना माहितच आहे.  एक व्यक्ती विवेकानंदांना म्हणते की आईची महती जेवढी गायली जाते तेवढे महत्त्व  पित्याला का दिले जात नाही? तेव्हा ते त्या व्यक्तीला पोटाला एक धोंडा बांधून काम करायला सांगतात. तेव्हा दुसऱ्याच दिवशी ती व्यक्ती , माझी कंबर, पोट दुखतंय म्हणून ओरडत येते. तेव्हा स्वामी म्हणतात की ती माऊली नऊ महिने तुला पोटात घेऊन वाढवते, तुझे कधीही तिला ओझे झाले नाही, तिने कधीही कंटाळा केला नाही, त्या मातेची महती तिन्ही लोकांत सर्वश्रेष्ठच आहे.
      शिवाजी महाराजांसमोर सुभेदाराच्या सुनेला उभे करतात तेव्हा महाराजांच्या तोंडून.... अशीच अमुची आई असती.... असेच उदगार येतात.
श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवदगीता सांगितली ती संस्कृत मधे आहे .
विनोबा भावे यांनी आपल्या आईला गीता वाचता यावी म्हणून ती मराठीत लिहिली
  ती 'गीताई.'
     जगात एवढे देश आहेत पण कोणताही देश मदर, मम्मी असा उल्लेख करत नाही.
आपण    ' भारतमाता '  असा उल्लेख करतो.
आपली मातृभूमी असंच म्हणतो.
आता आपली मुंबई
  मुंबा+आई
Mum in English
Ba in gujrathi
Aai In Marathi

     आता जरा घराकडे वळू.
पुर्वी सासूला- सासुबाई, मामी, आत्या, माई म्हणत असत, मधल्या काळात अहो आई म्हटलं जाऊ लागलं !!!!
पण 'अगं', 'ए', हे नातं जास्त जवळचं वाटतं. हो ना!!!!
ए आई, ए मामी, ए मावशी, ए ताई, ए आत्या.....
तर आता सुना सासुबाईंना  
'ए आई'  म्हणू लागल्या आहेत.
यावर एका सुनेने सांगितलेला विचार मस्त आहे.....
ती म्हणाली मी तुला ए म्हटलं, माझ्या आईला म्हणते तसं.....
     तर आई काही सांगण्यासाठी जसं रागवेल तर तिचा राग येत नाही ना तसाच सासूचा पण राग येणार नाही.
   किती छान विचार आहे हा !!!!!!

मे महिन्यातील दुसरा रविवार हा आंतरराष्ट्रीय मातृदिन म्हणून साजरा केला जातो.

लॅबर्नम

सुप्रभात.......
    
     आज सकाळी बाहेर पडले आणि चौपाटीच्या दिशेने जातांना लॅबर्नम रोडला लक्ष वेधून घेतले पिवळ्या रंगाच्या गालीच्याने......

       आश्चर्य वाटलं ना!!!!

      अहो, लॅबर्नम फुलांचा मस्त सडा पडला होता. या फुलांमुळेच तर या रस्त्याला लॅबर्नम रोड हे नाव मिळालंय.
मग नादच लागला, कुठे कुठे ही फुलं, या फुलांचा सडा दिसतो हे बघण्याचा. हा एक वृक्षच असतो. ही फुलं म्हणजे तेजस्वी पिवळ्या फुलांचे झुबकेच असतात. पानं छोटी छोटी असली तरी झाड मात्र भरगच्च हिरवंगार पानांनी भरलेलं असतं.
     उन्हाळा सुसह्य करण्यासाठी निसर्ग सुसज्ज आहे. चला तर लॅबर्नम रोडला देऊया भेट!!!!
आणि लुटूया आनंद ........   

      निसर्गाने अंथरलेल्या गालिच्याचा !!!!!!

 

 

 

 

मंगलमय सकाळ

      घरातून बाहेर पडले तर वाडीच्या बाहेरच असणाऱ्या तेजस्वी पिवळ्या रंगांच्या लॅबर्नम फुलांनी लक्ष वेधले.
पुढे चालायला सुरूवात केली दाभोळकरांचे दत्तमंदिर, जे फक्त दत्त जयंतीच्या दिवशी सर्वांना खुले असते,
 तेथे मधुमालतीच्या फुलांचा मस्त सुगंध, पुढे विल्सन कॉलेजच्या येथून रस्ता ओलांडला, आणि कॉलेजकडे बघितले, पांढऱ्या चाफ्याचे सुंदर गुच्छ, झाड नुसते बहरलेले!!!!!
 चला , सूर्य दर्शन कसं होणार????

     टिळकांना प्रणाम केला

 आणि एक बाईक गोदरेज गार्डनपाशी थांबली
       (आता यात काय विशेष ??)
    तर..... त्या बाईकवर मागच्या सीटवर एक पुरूष वॉकर घेऊन बसला होता, ज्याचा उजवा पाय दुखावला होता, पायाला पट्टा होता, पुढे बसलेला माणूस म्हणाला, तुला पाय टेकवायचा नाही ना!!!! सलाम केला त्या व्यक्तीला, त्यांच्या जिद्दीला, मनोमन.
     मग बदामांची झाडं त्या फुलांचा मंद सुवास......

तेवढ्यात मागून   हरी ॐ   हा आवाज आला.....तर आमचे शिंपी....... त्यांच्याबरोबर गप्पा मारतांना मस्त विचार कळला,  ते प्रत्येक देवाचे नाव दहा दहा वेळा घेतात, म्हणजे १ तास चालण्याचा कसा होतो ते कळतच नाही. सुंदर विचार!!!!!
      आणि आलंच की सूर्यदर्शन होण्याचं ठिकाण!!!

     ६.३० झाले होते पटापट फोटो काढले, बघा कसं मस्त झालं सूर्यदर्शन, पण पूर्ण ८ मिनिटे वाट बघावी लागली. पण आज भरतीची वेळ जवळ असावी.   लाटांचा मस्त आवाज येत होता.








 

कपड्यांसंबंधी टीप्स...


o ऋतुनुसार, वय, उंची, पेशानुसार कपडे खरेदी करावेत, वापरावेत.
o लग्नकार्य, सहल, रोजचे ऑफिस, रात्री झोपतांनाचे कपडे वेगवेगळे असावेत.    
   काही कपडे, वापरता येत नाहीत, टाकूनही देता येत नाहीत आपल्या आठवणी असतात ,
   तर अशा कपड्यांपासून पर्सेस, गालीचे बॅग्ज बनवून मिळतात. यांचे पत्ते फोन नं आपल्याकडे टिपून ठेवावेत.
 o कपडे चांगल्या प्रतीचे खरेदी केले तर जेव्हा आपण ते कोणाला तरी देतो तेव्हा ते जुने दिसत नाहीत. 
    व आपल्याला देतांना पण कसंतरी वाटत नाही.
    (अगदी बोहारणीला देतांना सुद्धा).
 o दिवसभर घरात पंजाबी ड्रेस वापरावा.आणि जर गाऊन वापरायचा असेल तर चांगल्या प्रतीचा वापरावा.
 o जुन्या जीन्स पासून सुद्धा बॅग्ज, स्कर्टस् शिवून मिळतात.
 o कपडे खरेदी करतांना जवळच्या दुकानातून खरेदी करावेत. म्हणजे ऑल्टर करावे लागणार असतील, 
    किंवा साडीला फॉल लावून मिळणार असेल तर वेळ वाचतो.
 o  कुठे बाहेरगावी गेलो तर तेथून कोणासाठी तरी कपडे खरेदी करू नये,
     न आवडल्यास, साइज लहान-मोठा झाल्यास बदल करता येत नाही.
     धुतल्यानंतर रंग विटका झाल्यास दुकानदाराकडे जाता येत नाही.
 o कपडे शिवतांना अस्तर लावायचे असेल तर ते चांगल्या प्रतीचे व स्वतः आणावे,
    धुवून इस्त्री करून मगच शिंप्याला द्यावे. 
 o  आपण जे कपडे खरेदी करतो ते जर ड्राय क्लीनींग करावे असे जर लिहिले असेल तर
     ड्राय क्लिनिंगच करावेत. आणि हो.... होम वॉश म्हटलं तरी ड्राय क्लिनिंगच करावे.
  o आपण कोणाला कपडे gift म्हणून देणार असू तर त्यांची आवड नीट माहिती असेल तरच द्यावेत.
     वापरेल एखाद्यावेळेस माझ्या आवडीचं, ते काय जन्मभर पुरणार आहेत का असं म्हणू नये.
~•~•~•~•~•~•~•~•~•~•

मस्त सुर्यास्त

काल सकाळी उठले आणि म्हटलं ....

चला आज वेगळंच करूया मॉर्निंग वॉक....

     सकाळी ८.४२ ची कर्जत रेल्वे  पकडून नेरळला भाच्याच्या वाढदिवसाला गेले.
     रेल्वेमधे खूप व्यक्ती वाचायला मिळाल्या. या विषयी नंतर कधीतरी!!!!!
     येतांना संध्याकाळी अंजीराचं झाड बघायला मिळालं, छोटे-छोटे अंजीर लागले होते,
     प्रथमच अंजीरचं झाड  बघितलं. 
     पूढे आले तर जाम या फळाचं फळांनी भरलेलं झाड......
     (मला जाम खुप आवडतात) मस्त वाटलं.
     स्टेशनला आले, तर समोर लक्ष वेधून घेतलं २ झाडांनी.
     गुलमोहोराचं झाड त्याच्या शेंगांनी भरलं होतं.
     तर बाजुला लॅबर्नमचं झाड!!!!
     मग ५.३६ ची रेल्वे पकडली. सुर्यास्त होत होता. डोंबिवलीजवळ खाडी,
त्या पाण्यात सुर्याची किरणे पाणी सोनेरी करत होती.
  पाणी हलत होते आणि किरणं त्यावर लहरत होती.
 गाडी मुंब्र्याजवळ आली.
 मस्त!!!!
त्याचे किरण चमकत होते.
 गाडी पूढे आली विक्रोळी - घाटकोपर दरम्यान आणि मस्त...
लाल सूर्यगोल. नुसत्या डोळ्यांनी बघत रहावा असा,
 आणि ढग किंचित सोनेरी केशरी!!!!!
 असा    मस्त सूर्यास्त      चालत्या रेल्वेमधे बसून बघायला मिळाला.
एक वेगळाच अनुभव.

Thursday, 7 May 2015

कचरा गोळा करणारा....


     आज फिरायला बाहेर पडले. लो. टिळकांना अभिवादन केलं आणि पुढे गेले. तर कुत्रे भुंकण्याचा आवाज!!! का बरं ओरडत आहेत ????
 तर कचरा, म्हणजे रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, पेपरचे बोळे, प्लास्टीक, असं निरूपयोगी म्हणून असलेलं गोळा करणारा माणूस, त्याच्यावर कुत्रे भुंकत होते.
का बरं कुत्रे यांच्यावर भुंकतात?????
* त्यांचा पेहराव,
* की खरंच काही गोलमाल करतात हे लोक!!!!
माझ्या दृष्टीने यांना या कामाचे पैसे मिळत असले तरी, लोकांनी टाकलेल्या वस्तू गोळा करून सफाईचे काम करतात, कष्ट करतात, भीक तर मागत नाहीत.
पण कोणत्याही भागात कोणत्याही वेळी कोणीही कचरा गोळा करणारी व्यक्ती असेल तर कुत्रे यांच्यावर भुंकतातच.

गप्पागोष्टी....


★ का हो तुम्ही दूध स्वतः आणायला जाता ????
    हो. त्याचं काय आहे दूध आणणाऱ्याला ५ मि. उशीर झाला
 तर उगाच आपली चिडचिड होते.
हेच पेपरच्या पण बाबतीत.
( कोणी आणून दिलं तर त्याने वेळेत आणून दिलं पाहिजे ही अपेक्षा राहते. )

★ काय गं काय हे कपडे धुतलेत की.....
अहो , ती मोल देऊन काम करणारी मोलकरीण.
आपणच आपले कपडे धुवून वाळत घातले तर.....
 आपल्याला हवे तसे मिळतील.
(अपेक्षाभंगच होणार नाही)

★ हल्ली ना भांडी घासण्याचे खूप पैसे घेतात नाही का गं!!
अहो जरा विचार करून बघा ४ माणसांची भांडी घासण्याचे महिन्याचे पैसे,
 आणि महिनाभर होणारी भांड्यांची संख्या,
 (आणि आपण भांडी घासण्याचे काम करण्यापेक्षा आपलं बुद्धीचं काम करावं)

★ अहो, मी ना सकाळी उठल्या उठल्या पेपर वाचत नाही.
का बरं ????
मला तर पहिला पेपर हवा.
त्याचं काय आहे, जर पेपर सकाळीच वाचला तर
 त्यात नको असलेल्या बातम्या,
मग दिवसभर डोक्यात घोळत राहतात.

>  व्यक्ती तितक्या प्रकृती, हेच खरं.

>  हाताची पाचही बोटं सारखी नसतात.

>  प्रत्येकाला आपलं मत असतं.

>  आपले विचार, आपली पद्धत.

विस्मरण ??????


★ हल्ली काय झालंय माहित नाही काही लक्षातच राहत नाही.
    लक्षात राहण्यासाठी आपणच उपाय शोधायला पाहिजे.
*  एकावेळी एकच काम करावे
*  बाहेर जातांना यादी तयार करावी.
*  सकाळी उठल्यावर आज कोणती  कामं करायची आहेत याची नोंद करावी.
*  कोणाकडे गेल्यावर तेथून निघतांना आपण काही बरोबर आणलं होतं का ते आठवावे.
   (मोबाईल, चष्मा,पर्स,इ.)
*  आपण कोणाबरोबर बोलत असू तर पूर्ण लक्ष त्या बोलणाऱ्याकडे द्यावे.
    म्हणजे ते बोलणं आपल्या लक्षात राहील.
*  सारखं सारखं म्हणू नये की माझ्या लक्षात राहत नाही.
★ लक्षात ठेवण्यासाठी कानाला खडा लावावा.
    (कान पिरगळावा. पदराला गाठ मारावी)
   आपल्याला एखाद्या व्यक्तीला विसरायचं आहे ,
   बघा जमतंय का…… नाही जमत.

 म्हणजे आपल्या लक्षात चांगलंच राहतं.

Monday, 4 May 2015

बोगनवेल

बोगनवेल

ही फुलं अनेक रंगात बघतोआपण... पण या झाडाला काटे असतात. फांदीच्या शेंड्यावरील काट्याचे परिवर्तन या फुलोऱ्यात होते.
कुठल्याही रंगाचं फूल असो, बघत रहावं असं हे फूल!!!!
या फुलात मस्त तुरे असतात. पाकळ्यांचा आकार पानासारखा असतो. ही फुलं झाडावर खुप दिवस,३/४ दिवस तरी मस्त दिसतात. आणि खाली पडली की अगदी हलकी, वारा आला की धावतात.
खुप दिवस झाडावर दिसणारी, काटेरी झाड असलेली ही फुलं-घर, संस्थांच्या कुंपणाला सहज दिसतात. बहुतेक या झाडाला सूर्यप्रकाश जास्त असेल तर बहरत असावं.
     यासाठी कुंडी, वाळू असलेली जमीन, लाल मातीची जमीन सुद्धा चालते.
यात हिरवट पांढरा, लाल भडक, जांभळा, सर्वसाधारण जास्त दिसणारा गडद गुलाबी/ राणी, हळदी पिवळा..... अशा सुंदर रंगात ही फुलं असतात.

मोर

नाच रे मोरा आंब्याच्या…….
अहाहा.......
     नजरेसमोर येतो नाचणारा मोर. बऱ्याच वर्षांपुर्वी राणीच्या बागेत गेले होते मोराला बघितलं आणि सहज शब्द आले.....
थुई थुई नाच माझ्या.....
आणि आश्चर्य म्हणजे मोर नाचू लागला की !!!!!!!
     त्यानंतर बडोद्याला गेले होते. तिकडे पांढरे मोर. परत एकदा म्हणून तर बघूया म्हटल्या त्या ओळी.....
आणि चक्क आपला पांढरा पिसारा फुलवत मोर नाचू लागला.
    त्यानंतर आत्ता आत्ता ताडोबा जंगलात गेलो तर ४/५ मोर, लांब होते पण ते नाचतांना बघण्याचं भाग्य लाभलं!!!!!!
      तसं सकाळी फिरायला मलबार हिल येथे जातांना मोराचा केकारव ऐकला आणि क्षणभरात मोर दिसला.
आणि हो.....काही वर्षांपुर्वी आमच्या वाडीत संध्याकाळ्च्या वेळी मोर आला. चक्क समोरच्या चाळीच्या कौलावर दिमाखात बसला होता. इतका उडत उडत तो कुठून आला आणि कुठे गेला ?? पण आम्हाला मात्र मस्त दिसला हे खरं!!!!
     काही वर्षांपुर्वी..... अहमदाबादला गेले होते तर मोर रस्त्यांनी आपल्याबरोबर चालत असत. त्यांची पीसं गोळा करण्यासाठी रानात गेलो होतो. (त्यावेळी मोरांचा नवी पिसं येण्याचा काळ होता) तर .....अगदी थोडी छोटी पीसं मिळाली होती.
     लहानपणी असं प्रत्येकाला वाटत असेल आपल्याजवळ मोरपीस असावं आणि ते आपण पुस्तकात जपून ठेवावं. मला काही लहानपणी मिळालं नाही मोरपीस! पण आता मात्र मी पुस्तकात ठेवलंय.
मोरपीसाचे रंग, त्याची कोमलता, सुंदरता मन मोहवून टाकते हे मात्र नक्की!!!
★ श्रीगणेशाने मोरपीसाने, व्यासांनी सांगितलेले महाभारत लिहिले.
( असं चित्र बघितलंय)
★श्रीगणेशाचा भाऊ- कार्तिकेय यांना
मोरपीस वाहण्याची प्रथा आहे.
★शारदा देवीचं वाहन,
★श्रीकृष्णाच्या डोक्यात खोवलेलं मोरपीस,
चित्रात जरी बघितलं तरी मस्त वाटतं.
★ देवांना वारा घालण्यासाठी मोरपीसांचा पंखा वापरतात.
*********************************

Friday, 1 May 2015

प्रति बालाजी


     हे मंदिर सातारा रोड येथे आहे. पुन्हा पुन्हा जावं असं वाटतं , असं हे मंदिर.
     या मंदिरात मी वेगवेगळ्या वेळी गेले आहे. अगदी सकाळी, भरदुपारी- पाय अक्षरशः पोळले होते, संध्याकाळी- मस्त दिव्यांची रोषणाई केली होती.

     तर.....  सुरेख होणारं बालाजीचं दर्शन  .....  म्हणूनच पुन्हा पुन्हा जावंसं वाटतं.

     नेटकी व्यवस्था, उत्तम स्वच्छता, घाई-गडबड, गोंधळ अजिबातच नाही. शांत, उत्तम निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर मनाला आनंद देऊन जातो. येथे प्रसाद द्रोणात देतात. पण जर प्रसाद थोडा जरी सांडला तर तो उचलण्यासाठी लोक आहेत, जेणेकरून प्रसादाला पाय लागू नये.
     येथे आपणही गेला असाल आणि छान झालेल्या दर्शनाने खुष झाला असाल!!!!!
तिरूपतीलाच जाऊन दर्शन घेऊन आल्याचं समाधान नक्कीच मिळालं असेल.
हो ना!!!!!!

जांभूळ

         सकाळी फिरायला बाहेर पडले आणि थोड्या थोड्या अंतरावर रस्ता जांभळा दिसत होता. नीट बघितलं तर लक्षात आलं...... अरे जांभळाचा  सिझन सरू झाला की !!!!!
 चौपाटीकडे जातांना ३/४ झाडं आहेत जांभळाची, आणि हो....वाडीत पण एक झाड आहे जांभळाचं!!!!!
     बाजारात १५० रु किलोच्या खाली जांभूळ मिळत नाही आणि इकडे रस्ते जांभळे होत आहेत !!!!!
     तर...... जांभळात, बदलापूर जांभूळ  प्रसिद्ध आहे. कर्जत, बदलापूर येथे द्रोणात जांभळं मिळतात. यातील बी अगदी लहान असते. मस्त दळदार, रसाळ, जीभ जांभळी करणारं जांभूळ हे इथलं वैशिष्टय !!!!! 
जांभूळ खायला खूप मज्जा येते.
      मधूमेह असणाऱ्यांना जांभूळ हे वरदान आहे. याच्या खोडापासून ग्लास बनवतात. यात रात्रभर पाणी भरून ठेवावे आणि सकाळी उठून
प्यावे, असं म्हणतात. याच्या बियांचे चूर्ण, पाने पण उपयोगी आहेत.
0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0…
      खरंच आत्ता येणारी फळं, आणि फुलणारी फुलं, कोकिळेचे कुजन, यामुळे उन्हाळा थोडातरी सुसह्य होतो
है ना....!

छान काही सुचलेलं

""""""""""""""""""""""""""""""""""""
🌹 आपण एखाद्या समारंभाला जातो. 
तो दिवस त्या समारंभासाठीच ठेवावा,
म्हणजे त्याचा आनंद पूर्ण घेता येतो.

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
एखाद्याला भेटावंसं वाटलं तर किंवा
 एखाद्याला घरी बोलवावंस वाटलं
 तर ती गोष्ट लगेच करावी.
ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं
आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर श्रोता व्हावं.
काही शिकायला गेलो तर विद्यार्थी व्हावं.
×०×०×०×०×०×०×०×०×०
अाहेर स्वीकारला जाणार नाही
 असं जर छापलं असेल तर खरंच अाहेर घ्या
 म्हणून आग्रह करू नये.
 व त्यांच्या विनंतीचा मान राखावा.
ööööööööööööööööö
आपल्याला दुकानात गेल्यावर
 एखादी वस्तू आवडली तर
 लगेच खरेदी करावी नंतर बघू म्हटलं तर
 ती वस्तू तशी मिळेलच असं नाही.
मग हळहळ, रूखरूख, आठवण, 
त्यावेळी घ्यायला हवी होती,
 या व्यतिरीक्त काही हातात राहत नाही.
ôôôôôôôôôôôôôôôôô