Monday, 27 April 2015

कैलासवृक्ष


देवाची सुंदर कलाकृती... नागचाफा !!!!!!

 

     हे तजेलदार आकर्षक रंगाचं मस्त फूलअसतं.
आमच्या इथे शंकराच्या मंदिराच्या प्रवेश दाराजवळ मी हे प्रथम पाहिले. ते मला खुपच आवडलं. कारण या फुलाचा मनमोहक रंग.
मनमोहक रंगामुळेच हे फूल कोणालाही आवडेल.
     हा एक वृक्षच असतो. या वृक्षाच्या बुंध्यालाच जमिनीपासून काही फुटावरच डहाळ्यांना कळ्या येतात. सकाळी सातच्या दरम्यान त्या फुलतात. काहीवेळा फुलं गुच्छासारखी असतात. तर काहीवेळी एक एक फुल असतं. कळ्यासुद्धा लहान मग मोठी मोठी या क्रमाने असतात. फुल फुलल्यावर काहीसा मंद सुवास असतो
नागचाफ्याचे पुकेसर हे नागाच्या फण्यासारखे असतात. म्हणूनच याला नागचाफा म्हणत असावेत. आणि या फण्याखाली जणू काही शंकराची पिंडी असावी असा आकार असतो.
     जेव्हा फुलं खुप येतात तेव्हा देवळातील पिंडी या फुलांनी सजवतात. तेव्हा खुपच छान वाटतं.

 फळ ---

       याचे फळ म्हणजे तोफेचा गोळाच जणू. मी याचं फळ थोडं उंचावर बघितलं आहे. रंग फिक्का तपकीरी. पण दोन हातात जेमतेम मावेल असा आकार असतो. जणू झाडाला लटकवलेले मोठे चेंडूच.ते फळ पिकलं की पडतं आणि पडतांनाच  फुटतं तेव्हा याचा वास उग्र असतो.
     याची पानगळ वर्षातून तीन वेळा होते सर्व पानं पडतात व ती पडतांनाच पाठून नवी पालवी येते. त्यावेळी पण झाड मस्त दिसतं!!!!
तर असं हे नागचाफ्याचं झाड फोर्जेट हीलच्या कॉर्नरला पण मी बघितलं आहे. याची फुलं मी हातात घेतली आहेत त्याचं छान निरिक्षण पण केलं आहे.

     असं हे मला आवडणारं फुल ....... नागचाफा  !!!!!

 

 

 

 


 

काही छान वाचलेलं, ऐकलेलं

> हजारो लोकांच्या समुदायात एक प्रश्न विचारला.....
तुमच्यापैकी किती लोक आपल्या आई-वडिलांच्या घरात राहता ????
तर पंधरा- वीसच हात वर आले.
तरीही माणूस स्वतःचं घर होण्यासाठी धडपड करत असतो.
( आपली मुलं त्या घरात राहणार नाहीत हे माहित असून सुद्धा!!!!)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

> का हो तुमच्या जवळ आई-वडील असतात का ?

नाही, आम्ही आमच्या आई- वडिलांजवळ राहतो.

( किती मस्त ना!!!!!!)

ÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖ

> उपवास म्हणजे काय ?

उपवास म्हणजे देवाजवळ राहणे.

---------------------------------

> जेव्हा गणेश चतुर्थीला आपल्याकडे गणपती येतो,
 त्यावेळी रात्री गणपती समोर समई, निरांजन लावावे,
 शांत बसून दर्शन घ्यावे.
आपल्याला प्रसन्न वाटतं, समाधान मिळतं

=========================

> धन्यवाद देणे हा मोठा सद्गुण आहे.
कोणालाही धन्यवाद देतांना ते मनापासून द्यावेत,
 कोरडेपणाने  thanks असं म्हणू नये.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

> सुखात, आनंदात सहभागी व्हावेच,
 पण दुःखात, अडीअडचणीच्या वेळी नक्की जावे.
 प्रेमाने पाठीवरून हात फिरवावा.
स्पर्शाची भाषा छान काही सांगून जाते.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

> संकटकाळी आधाराचे आश्वासक शब्द खूप काही सांगून जातात.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

> भूतकाळात एखादे संकट येईल
 या भितीने वर्तमानकाळ चिंतेत घालवू नये.
 एखादवेळेस ते संकट येणारसुद्धा नाही.

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

> जे आपल्या हातात नाही त्यावर विचार करू नये.
जे आपल्या हातात आहे त्याचा विचार करावा.

********************************

> काळजी करू नये असं कोणी सांगितलं 
तरी ज्याला काळजी लागते ती लागतेच

 त्यावर ज्याने त्याने स्वतःच उपाय शोघला पाहिजे.

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

> लहानांकडून आपण खूप काही शिकतो,
 फक्त आपण कायम विद्यार्थी असलं पाहिजे

★★ ★★ ★★ ★★ ★★ ★★ ★★

मॉर्निंग वॉक

आजोबा.....

फिरायला येणारे एक आजोबा आहेत.
मॉर्निंग वॉक.....
एक दिवस एक मोटार बाथजवळून मागे मागे जात होती ती कैवल्यधाम पर्यंत गेली. आणि थांबली. त्यातून एक ज्येष्ठ उतरले. मागून २ तरूण उतरले त्यांनी त्यांचा हात धरला आणि त्या व्यक्ती बरोबर चालू लागले. ते वयस्कर थोडं चालले आणि एका group मधे जाऊन बसले. बहूतेक ते खूप वर्ष येत असावेत.
मला त्यांचा वक्तशीरपणा खूप आवडला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

     दोन police गाड्या मॉर्निंग वॉक करत होत्या!!!

का बरं त्या अशा जात आहेत?
नीट बघितलं तर त्याच्या पुढे कुणी पोलीसमधील वरिष्ठ वॉक घेत होते त्यांच्याबरोबर त्यांचे बॉडीगार्ड चालत होते आणि मागून या दोन गाड्या स्लो चालत होत्या.
असंही मॉर्निंग वॉक.....
ज्याला करायचं आहे तो कारणं सांगत नाही हेच खरं.
========================

Thursday, 23 April 2015

आश्चर्य

आश्चर्य वाटेल अशी घटना..

     चर्चगेटला रेल्वेत बसलो. आणि एक व्यक्ती जी लोकांकडे हात पसरून मदत मागत होती. व्यक्ती अशक्त तर होतीच पण थोडसा पोलीओ असावा अशी अपंग पण होती.
     मी ती व्यक्ती लांब असतांना बघितलं, यांना खूण केली की 'त्यांना' मदत करा.
यांनी १०/- रू. ची नोट त्याना दिली. तर त्याने काही चिल्लर जी हातात होती ती यांच्यापुढे केली व यातून काढून घ्या असे खुणेनेच सांगितले. यांनी नको असे खुणेनेच सांगितले
     ती व्यक्ती संपूर्ण डबा फिरून परत आली व यातून पैसे काढुन घ्या असे खुणेनेच सांगितले. यांनी परत ठीक आहे नको असे खुणेनेच सांगितले.
     आम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की ती व्यक्ती २ वेळा येऊन यातून पैसे घ्या म्हणून सांगत होती.
     नाहीतर हल्ली पैशांना एवढं महत्त्व आहे की फुकट, काही काम न करता जेवढे पैसे मिळतील तेवढे हवे असतात.

पण..... ही व्यक्ती वेगळीच भासली.

कावळा

कावळा

     अगदी लहानपणीच कावळ्याची ओळख गोष्ट रूपाने होते.
    आपल्याला कावळा रोजच दिसतो, याच्या निरनिराळ्या कथा आपण ऐकतो....
      तर याच्या मी पाहिलेल्या घटनेबद्दल.....

★ काकनजर......

समुद्रकिनारी छान झाडं लावली आहेत. त्याच्या बाजुने बाक पण आहेत. तसेच कुंड्या
(थोड्या मोठ्या- पसरट ग्लास सारख्या) तर त्यात झाडं आहेत ना ती मोठ्या मोठ्या पानांची !!!!! म्हणजे त्याखाली कचरा टाकला तर दिसणार नाही इतकी मोठी पानं आहेत.
तर त्या तिथे एका कावळ्याने झडप घातली, माझं लक्ष तिकडे गेलं !!!!
     त्या कावळ्याने एक चिचुंद्रीचं पिलु पकडलं. नंतर अर्थातच ते गट्टंम केलं

★ फळं खाणारा कावळा...

     असंच आमच्या गॅलरीत एक कावळा यायचा तो फक्त फळं खायचा. पोळी, मारी बिस्कीट ठेवलं खाण्यासाठी तर खायचा नाही.
(मात्र आम्ही काशीयात्रा केल्यानंतर मात्र हा कावळा कधी आला नाही)

★कसं समजतं कावळ्यांना...

      एक फरसाणवाला शंकराच्या देवळात रोज सकाळी येत असे. तर त्याच्या डोक्यावरून २५/३० कावळे उडत उडत येतांना मी बघत असे. प्रथम मी बघितलं तर मला कळलं नव्हतं. पण नंतर लक्षात आलं की तो फरसाण टाकतो तिकडे म्हणून ते त्याच्याबरोबरच येत असंत!
असे हे कावळे!!!!!
कावळ्यांच्या प्रत्येकाकडे काहीना काही अनुभव, कथा असतीलच असतील !!!!
आणि तरीही कळायला लागल्या पासून दिसणारा.... ते मनुष्य गेल्यानंतरही काही सुचना देणारा.....
अगदी नातेवाईक हात जोडून प्रार्थना करतात येथपर्यंतचा सोबती.....
याच्या अनेक कथा....
★ माहेरवाशीण, दारात कावळा ओरडला तर कोणीतरी माहेराहून येणार म्हणून वाट बघते.
★ याला कोणीही पिंजऱ्यात ठेवत नाहीत. त्यामुळे तो मुक्त पक्षी.

★ काऊ म्हटलं की चिऊ हवीच 

 

  एक असतो काऊ 

आणि एक असते चिऊ 

काऊचं घर शेणाचं 

आणि चिऊचं घर मेणाचं ......

★ आणि महत्वाचं परिसर स्वच्छ करण्याचं काम तर करतोच.
★ कितीही नावडता असला ना तरी  माणसाला चुकून जरी याचा स्पर्श झाला तरी इतर कावळे त्या कावळ्याला टोचून टोचून मारतात. असं का ते मात्र कळलेलं नाही.

★ कावळा घर बांधतांना बघितलंय ??

घर बांधण्यासाठी हँगर, तारा त्याला फार प्रिय असतात. का कुणास ठाऊक ? आणि वाळलेल्या गवताच्या काड्या.
आणि असं म्हणतात की कावळा घर बांधायला लागला की लवकरच पाऊस पडणार.
★ कोकीळ पक्षी आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात ठेवतो. आणि हा त्याची पिल्लं वाढवतो.
★ शहरी कावळ्याला जर वेगळ्या जातीचा (डोमकावळा) दिसला तर इतर कावळे गोळा होऊन हुसकावून लावतात.

~ आपण चित्र काढतांना देखाव्यात सोप्पे कावळे काढतो. की ते चित्र छान दिसतं.

~ कावळा सरळ उडतो.
कारण म्हणे> तो म्हणतो .... का-वळा
~ भूक लागल्यावर आपण म्हणतो...... पोटात कावळे ओरडतायत / कोकलतायत.
~ मुलं गलका करत असतील तर ....काव काव करू नका.
~काकस्पर्श-  त्याच्या नावाचा चित्रपट
~ कावळ्याची नजर आहे..
~ एकच डोळा आहे याला असंही म्हणतात.
~ कावळा म्हणे मी काळा
पांढरा शुभ्र तो बगळा
अशा काव्यातूनही भेटतो.
~ गजानन महाराजांनी आज्ञा देताच कावळे वऱ्हाडातून निघून गेले ते आजपर्यंत तेथे नाहीत.(असं म्हणतात).







असं म्हणत
काव काव काव
सोन्याची बाव
पाहूणा यायचा
नसला तर
बाळाच्या डोक्यावरून
उडून जाव

Tuesday, 21 April 2015

देवाजवळचे पैसे

सहज गप्पामधून कळलेला एक सुंदर विचार......

     आपल्याला वेतन मिळाले, किंवा business मधून पैसे मिळाले तर आपण ते देवासमोर ठेवतो.
पण...एक मैत्रिण गप्पांमधे सहज म्हणाली की तिच्या ओळखीत एक बाई आहेत त्यांना कुठेही पैसे मिळाले, म्हणजे अगदी भाजीवाल्याकडून परत मिळाले की ते पैसे रामायणाचे पुस्तक आहे त्यात ठेवतात.
मस्त वाटलं हे ऐकून.
का बरं असं करतात त्या ???
➡ ते पैसे कुठुन कुठुन कोणत्या लोकांकडून येतात काय माहित ?
तर रामायणातल्या पुस्तकात ठेवल्यामुळे ते सरळ पण होतात आणि गुंडाळी केलेले पैसे आपल्या हातात आले तर कसं वाटतं ? आणि सरळ नोट आली तर किती छान वाटतं
कोणाला भेट म्हणून आपण पाकिटात पैसे देतो तेव्हा सुद्धा नोट कोरी असेल तर देतांना जेवढं छान वाटतं त्याहुन ज्याला देतो त्याला छान वाटत असेल.
पुन्हा रामायणातले पैसे देतांना आपल्या मनात पण छान विचार असतो आणि ज्याच्या हातात ते जाणार त्याचं काम पण चांगलं होईल.कारण ते देवाजवळचे पैसे आहेत ना!!!
किती सुंदर आहे ना हा विचार.......

महालक्ष्मी

ॐ जय जय आई जगदंबा
   आज सकाळी ५.०० वाजता महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी निघालो. (बरोबर मैत्रीण) टॅक्सी चालक जो महाराष्ट्रीयन.
छान आंघोळ करून तयार होता. लगेच हो म्हणाला. यासारखं सुख नाही.
     आणि  निघालो जेथे उतरलो तेथुन एकदम मंदिरात पोहोचलो. आरतीची वेळ ५.३० असे समजले. ५ मि. मध्ये आरती सुरु झाली आणि आम्हाला आरतीची पुस्तिका मिळाली. त्यामुळे आरती म्हणण्याचा आनंद मिळाला. त्यानंतर सुरेख दर्शन झाले.

ताडगोळेवाला

ताडगोळे.......

काल दुपारी शाळेतुन घरी येताना ताडगोळेवाला दिसला.
गेली ५ वर्ष तरी मी ताडगोळे त्याच्याकडूनच घेते.
(जेव्हा सिझन असतो तेव्हा)
 तो काम करता करता असं लक्षात आलं की किती हे काम कष्टाचं आणि कठीण आहे.
त्याला म्हटलं काढू का तुझा फोटो ???
 तो तर खुश झाला. मग त्याला म्हटलं की ये फोटो whatsapp पर जायेगा
मग तर तो अजूनच खुश झाला.
त्याचे दोन फोटो काढले.
तो मस्त गप्पा मारत होता.
ताडगोळा कसा सोलायचा म्हणजे तो फुटत नाही त्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
 आणि एक टीप दिली की ताडगोळा जर थोडावेळ फ्रीजमधे ठेवून सोलला तर तो न फुटता सोलला जातो.
मस्त आपल्याला आवडतात तसे ताडगोळे देतो, न सांगता.
कडक ताडगोळे खाल्ले तर पोट दुखतं अशी माहिती पण सांगितली.
मग कधी येताय ताडगोळे खायला???????
( माझ्याजवळ असलेला केक मी त्याला दिला तर त्याला खुपच आनंद झाला)
      कसं असतं ना आपण या लोकांना भाव विचारतो,
कमी कर म्हणतो,पण वस्तू चांगली निघाली तर सांगत नाही.
 ही माणसं सुद्धा प्रेमाची,२ गोड शब्दाची भुकेली असतात.
सुख सुख म्हणजे तरी काय हो

समोरचा आनंदी तर आपण पण सुखी!!!!!! है ना.

















Monday, 20 April 2015

शहीद तुकाराम गो. ओंबळे

सहाय्यक पोलीस निरिक्षक.....

शहीद तुकाराम गो. ओंबळे

२६ - ११ - २००८ रोजी यांनी याच स्थळी दहशतवादाविरूध्द आपल्या प्राणाची आहुती देऊन, साहसाची परंररा कायम केली आहे.
मातृभूमीच्या रक्षणासाठी अर्पिले त्यांनी प्राण,
सतर्कतेची ज्योत पेटवू, व्यर्थ न हो बलिदान.
प्राणाचे देऊनी बलिदान, वाचविले असंख्य प्राण
हे शुरविरा। आपणास
मुंबईकरांचा प्रणाम!!!!!
(हे त्या प्रेरणास्थळी लिहिले आहे)
    
यांना सुद्धा वंदन करून  पुढे जाते
हे पाहतांना त्यांनी केलेले कार्य नजरेसमोर येते.

स्वामी समर्थ

भगवद् गीतेच्या नवव्या अध्यायातील श्लोक.....

' अनन्याश्चिंतयंतो मां ये जनाःपर्यूपासते ।

तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।।'


हा श्लोक स्वामींनी म्हटला
- आणि महानिर्याण !

चैत्र वद्य त्रयोदशी शके १८०० या दिवशी श्रींनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली.

     आज तो दिवस....

।। भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ।।

मठात अखंड नामस्मरण सप्ताह होता त्याची आज सकाळी ६.०० वाजता सांगता झाली.
आज मी मठात गेले होते खुप
छान वातावरण होतं
दर्शन मस्त झालं गर्दी असुनही .
रांगोळी काढुन प्रवेशद्वार सजवलं होतं
रोजच्या पेक्षा वेगळी व्यवस्था होती.प्रसादासाठी ३ प्रकारचे लाडू, दाणे- पत्री साखर,
उपवासाचा बटाटा चिवडा एका द्रोणात देत होते.
      सुंदर फुलांचे तोरण,
 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं लिहिलेल्या पताका,
असं प्रसन्न वातावरण, आणि त्यानंतर मस्त स्वामींचे दर्शन.......

आजची सकाळ सुंदर झाली

 

 

 

 

 

 


उन्हाळी चाफा

चाफा...
चाफा म्हटलं की नजरेसमोर येतात... कवठी चाफा, सोनचाफा, हिरवा चाफा,
लालचाफा, पांढरा मोठ्या पाकळ्यांचा चाफा, आणि या चाफ्याला मी म्हणते उन्हाळी चाफा.याबद्दलच मी आता सांगणार आहे.
     हा चाफा उन्हाळ्यात इतका फुलतो की झाडावर पान नसतंच. सगळीकडे फुलांचे मस्त गुच्छ!!!!
     लहानपणी सगळ्यांनीच याच्या अंगठ्या केल्या असतील, कानात कसं दिसेल हे पण बघितलं असेल, आता तर याचे केस बांधण्यासाठी क्लिप्स पण आले आहेत.
असंही हे फूल डोक्यात घालत नाहीत. पण याची सुंदरता बघून कोणीतरी क्लिप्स बनवल्या. मस्त!!!!!!
     पाच पाकळ्याचं हे फूल अगदी आत गडद पिवळं आणि नंतर फिक्कं होत पांढरट दिसतं. देठ तांबूस चॉकलेटी असतं. या चाफ्याला बहुतेक वास नसतो
     आणि काही अगदी पांढरी मोठ्या पसरट पाकळ्यांची.
अप्रतिम दिसतात झाडावर.
२/३ दिवस तरी झाडावर असतात. आणि खाली पडलेली दिसली ना की ती उचलावीशी वाटतात.
     चाफा प्रकारातलं कोणतंही फूल असो चाफा तो चाफाच! हवा हवासा वाटणारा !!!!!!


चाफा...!!







झोपाळा

चला ......
आज काहीतरी वेगळं करूया. झोपाळ्यावर बसुया.
बालभवन बागेत गेले तशीही ही बाग मला रोजच खुणावत होती.

सुरेख निगा राखलेली बाग हे तिचं वैशिष्ट्य !!!!!

      तसंच स्त्रिया आणि लहान मुलांसाठी आहे ही बाग.
     ही बाग सुर्योदयाला उघडते आणि सुर्यास्ताला बंद होते.

आणि मस्त झोपाळे! 

तसंच अजूनही लहान मुलांसाठी अनेक खेळ!!!!
     तर मी आज मोठ्यांसाठी असलेल्या झोपाळ्यावर बसले.
 खुप मस्त वाटलं!

 त्यासाठीच तर मी गेले होते ना मी. 

झोपाळा सगळ्यांनाच प्रिय.

 जिथे आपण जातो त्या घरी असेल तर आपण हमखास बसतोच.
 त्यावर बसल्यावर गाणं, कविता गुणगुणतोच.
या ठिकाणी
तगर, जास्वंद रातराणी, कण्हेर, चाफा पांढरा आणि लाल, बोगनवेल तर अनेक रंगात!!!
 अशी अनेक फुलझाडे फुलांनी फुललेली आहेत.

अशीही सुंदर बाग....



Thursday, 16 April 2015

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

पुतळा

 जे आपण पुतळे बघतो ना

 ते इतके भावदर्शी आणि सुडौल असतात की 

आपल्या मनात त्यावेळचा इतिहास जसाच्या तसा उभा राहतो.

गिरगाव चौपाटी येथील
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे समाधी स्थान.
      ते समोर उभे आहेत की काय असे वाटते.

     त्यांना वंदन करून मी पुढे जाते.

    हे पाहतांना त्यांनी केलेले कार्य नजरेसमोर येते आणि सहज तोंडातून ' वाहवा ' असे शब्द निघतात.
     पण लोकमान्य या चित्रपटात सुबोध भावे यांनी ही भूमिका उत्तम केली आहे. चित्रपट बघताना आपण त्या काळात जातो.
     मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावी असलेल्या त्यांच्या घरी मात्र मला जाता आलं हे मी माझे भाग्य समजते.














कोकीळ

कुहूS कुहूS कुहूकुहूकुहू.....

     आज जाग आली तीच मुळी कोकीळ पक्ष्याच्या गायनाने...

.वेळ होती ब्रहम  मुहूर्ताची.
      किती छान गात होता कोकीळ. अरे आपण कुठे आहोत???
मुंबईतच ना!!!!!

     कोकीळ मस्त गात होता.

मग आठवण झाली ती कोकीळा व्रताची. याबद्दल नुसतं ऐकलं आहे वाचलं आहे.
त्यानंतर त्याच्या धूर्तपणाची कथा.....
तो म्हणे आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात ठेवतो. असो....

     कसा असेल बरं हा पक्षी????

गातो तेव्हा याच झाडावर आहे हे जाणवतं पण दिसत मात्र नाही. 
मात्र खुप वर्षांपुर्वी झाडावर याला बघण्यात यश मिळाले. 
आणि नंतर कधीतरी वाडीतच कुणीतरी पकडून पिंजऱ्यात ठेवलेला बघितला.

     पण याच्या गायनाने आपण मंत्रमुग्ध होतो हे मात्र नक्की.

Monday, 13 April 2015

घंटेचा नाद

    आज सकाळी फिरायला बाहेर पडले .
 तर पश्चिमेला चंद्रदर्शन.
      मरीनलाईन्सला कसं होईल सुर्यदर्शन? विचार होता
आणि आजचा सूर्य म्हणजे ...

     अहाहा!!!!! 

सोन्याचा गोलच जणू!

 पण हे दृश्य २ मिनिटच शांत बसून बघितले
        आणि परत वळले तर त्यानंतर मात्र तो प्रखर वाटू लागला.

 चर्नीरोड स्टेशनला आले.

 तेथे एक छोटंसं साईबाबा मंदीर आहे त्या मंदीराला ग्रील लावलंय

तर येणारे लोक तेथे घंटा आहे ती वाजवून पुढे जात होते.

     आता वाटेल यात काय विशेष ?

      पण घंटा वाजवण्यासाठी एक दोरी लावली आहे
आणि तिला हात लावून वाजवत होते.
एवढ्या वेळेला मी त्या स्टेशनला गेले पण ही गोष्ट आज लक्षात आली.
तो घंटेचा नाद मनाला आवडला
आणि
 देवळात घंटा वाजवावी ह्याचा लोक आनंद घेत होते.......

 त्या सकाळच्या कामावर जाण्याच्या गडबडीत.

      मस्त वाटलं हे.

सूर्योदय

आज सकाळी फिरायला गेले तर चौपाटीवर मस्त वातावरण!
सळसळती तरूणाई रंगीबेरंगी कपड्यांमधे कसरती करत होती
     मग पुढे मरीन ड्राईव्हला सूर्य दर्शन ...... अप्रतिम...
जणू चंद्रच. मस्त बघत रहावा असा देखणे दृष्य्.....
नजरेत साठवुन ठेवले.
परवाचे सूर्यदर्शन आणि आजचे किती निराळे!!!!!
परवा तर आकाशात कोणीतरी कंदील लावला आहे असे वाटत होते.
रंग लाल पण नजरेला सुसह्य लोभस पुनः पुनः पाहत रहावा असा......
पण..... हे दृश्य काही क्षणासाठीच आणि त्याच वेळी बघायला मिळेल असे नंतर मात्र सूर्य प्रखर होत जातो.
     आता ना एक छंदच लागलाय आज कसा असेल सूर्योदय ?
मस्त enjoy करते
MORNING walk.....

सुंदर काम

     मी morning walk ला जाते ना तर ..... 

     एक दिवस एक ६५/७० वय असेल त्या व्यक्तीचं. तर ते गृहस्थ हातातील प्लास्टीक बॅगमधून झाडाच्या बुंध्याशी काहीतरी टाकत आहेत हे मी लांबुनच बघितलं. माझी उत्सुकता वाढली. काय बरं टाकत आहेत????

     झाडाच्याजवळ गेल्यावर लक्षात आलं की ते खत घालत होते मुठीमुठीने, झाडाच्या बुंध्यापाशी... कसं आलं असेल लक्षात!

     किती सुंदर गोष्ट करत आहेत ते! पुन्हा त्याचा गाजावाजा नाही !!!! त्यात मोठेपणाचा आव नाही. 
     
     पण त्यांच्या चेहऱ्यावरील ते समाधानाचे स्मित खुप काही सांगून गेलं
    
    आता त्या झाडांकडे बघतांना 'ते' आठवतात. नाहीतर झाडांवर फूल दिसलं की तोडणारे/ कळी दिसली की ती उमलण्याआधीच तोडणारे लोक आपण बघतो.
     
     पण या व्यक्तीला मी मनोमन प्रणाम केला आणि......
    आपण सुद्धा हे किंवा या सारखे काम करू शकतो .

Monday Morning

मस्त समुद्रकिनारा.

 किनाऱ्यावर ओळींनी लावलेली नारळाची झाडे, त्याभोवती छोटासा पार !!! 
 आणि त्या झाडाभोवती सुंदर हिरवे गवत गालीचाच जणू! 
ओळीने लावलेली झाडं! 
 मग आकाशाकडे लक्ष गेलं तर खुप काळे ढग !!!!
 पण जेथून सूर्योदय झाला होता तेथे सोनेरी आकाश !!!!!

अप्रतिम!!!!!


२ मि. बसले आणि सूर्यनारायणाचे दर्शन झाले. पण ७.०० वाजताच त्याच्याकडे बघता येत नव्हते. मग नमस्कार केला आणि निघाले...... रस्ता ओलांडला आणि
 मस्त दृष्य..... पलिकडे पण नारळाची झाडे. आणि दूरवर कौलारू घर आणि ३/४ नारळाची झाडे आणि त्यातून सूर्यदर्शन...
 प्रखर भासलेला सूर्य असा आडून मस्त वाटला.

रेल्वे मधे बसले आणि पूर्वेकडे लक्ष गेले तर रेल्वेलाईनला लागून छान ओळीत माडाची झाडे. आणि आठवलं ८२/८५ मध्ये आमच्या वाडीत ४ नारळाची झाडे होती. आणि नारळ पडला की कोणीतरी धावत जाऊन नारळ घेअसे.... ती पण एक मजा होती.

मुंबईला सुंदर समुद्रकिनारा आहे.

 हे कोकणंच खरंतर पण शहरीकरण झालं आणि

 निसर्ग सौंदर्य कमी होऊन गगनचुंबी इमारती होऊ लागल्या

 तरीसुद्धा जाणीवपूर्वक निसर्ग जपण्याचा प्रयत्न होतोय छान वाटतं.

Saturday, 11 April 2015

ये मुंबई है।

असं म्हणतात मुंबई मधे कोणीही उपाशी राहत नाही.
किंवा.....
मनुष्य कोणताही व्यवसाय करून या मुंबईत पोट भरू शकतो.
आणि म्हणूनच या मुंबईचं सगळ्यांना आकर्षण आहे. इथे म्हणूनच माणसांचे लोंढे येत असतात. तर....
.
सकाळी फिरायला जाते ना तर किती लोक काय काय व्यवसाय करतात!!!!
कसा सुचलं असेल बरं यांना की आपण हा व्यवसाय करावा ??????
आता बघा.....

निरनिराळे ज्यूस...... थोड्या थोड्या अंतरावर. प्रत्येक ठिकाणी गर्दी

नीरा...... पाऊच मधे

गव्हांकुर.... तुमच्यासमोर काढुन एका छोट्या ग्लासमधे देतात

मधुमेह तपासणी..... मशीन घेऊन बसलेले असतात.

वजनकाटा..... लगेचच वजन, बॉडी फॅटस्, ऑक्सीजन लेव्हल, हार्ट रेट मॉनिटर कळतं

चणेवाला..... कबुतरांना चणे
आपण फक्त पैसे द्यायचे चणेवाल्याचा अजून एक माणूस ते चणे कबुतरांना घालतो.

नारळपाणी.....चौपाटीवर बसून नारळपाणी पिण्याची मजा काही वेगळीच आहे.

तसंच डीप डीप चहा....

आजतर बघितलं की फुलझाडं विकणारा.....
हे सगळे व्यवसाय सकाळी असतात. 


सुखाचा शोध


खुप उकडत आहे. आणि मधेच एक
वा-याची झुळुक येऊन जाते.....

आपण रिक्षा पकडत असतो. त्याचवेळी आपल्याला रिक्षा मिळते.
 आपण दोघेच असतो समोरच्याला आपण या म्हणतो.
 त्या व्यक्तीच्या
चेहऱ्यावर एक स्मित येतं.......

तिकिटासाठी भली मोठी रांग आहे आणि कुणीतरी आपल्याला तिकिट काढुन देऊ का विचारतं......

सिध्दिविनायकाचे दर्शन घ्यायचं आहे म्हणून आपण घरातुन निघतो.
 रांग मोठी असणार याची कल्पना असते. पण मंदिरात अजिबातच रांग नसते.......

मनात काही वास्तु बघायच्या असतात आणि अचानक आपल़्याला तेथे जायला मिळते.........

आपण कुठेतरी बाहेर जायचं ठरवतो आणि
अचानक कुणीतरी आपल्याकडे येतं की ज्यांची भेट क्वचितच होते.
 बरं झालं आपण बाहेर गेलो नाही हे वाटणं म्हणजे...... 

कुणाचं तरी लहान मूल येऊन आपल्याला बिलगतं.......

बऱ्याच वर्षांनी आपला मित्र अचानक आपल्याला शोधत शोधत येतो.......

एखाद्या ठिकाणी आपण सुट्टी व्यतित करण्यासाठी जातो तेथे आपल्याला अनेक लोक भेटतात
 जसे की गाडी ड्रायव्हर , तेथील कलाकार त्यांचा आपण फोटो काढला ,
त्यांना आईस्क्रिम कोल्ड्रींक ऑफर केलं तर त्यांच्या चेह-यावर जे हास्य दिसतं.....

मासेमारी

आज ओहोटी होती. त्यामुळे किनाऱ्याला थोडा कचरा होता. लक्ष सगळं आकाशाकडे लागलं. कालच्याप्रमाणेच मस्त सुर्योदय झाला २ मिनिटे शांत बसून उगवत्या सूर्यनारायणाचे दर्शन घेतले. आणि परत वळले तर समद्रात ४ कोळी जाळे बाहेर खेचून काढत होते  ते काढण्यासाठी त्यांना खुप श्रम होत असावेत.
त्याचवेळी साधारण    २००/३०० कावळे भराभर किनाऱ्यावर हजर झाले.
कसं कळतं यांना की आता आपल्याला खाणं मिळणार?
    तर त्या कोळ्यांनी जाळे बाहेर आणले तर मलातरी लांबून  असं वाटलं की खूपच मासे त्यांनी पकडले होते. ते बघतांना मनात विचार आला की किती कष्ट आहेत, या कामात! आणि ते किती निष्ठेने काम करत आहेत.
जाळं साधारण १०० फूट तरी असेल आणि व्यक्ती ४.
माशांच वजन आणि पाण्यातुन हे वजन खेचणं खुप कष्टाचं वाटलं मला.

बिन वासाचे फूल ... तगर


     आज लवकरच फिरायला बाहेर पडले. थोडा काळोखच होता.

 समोर लक्ष गेलं तर जणुकाही चांदण्याचं जमिनीवर अवतरल्या आहेत असे वाटले.


      पुढे गेले आणि लक्षात आलं

अरे हे तर तगराच्या फुलाचं झाड!!!!!

 किती सुंदर फूल ! 

पांढरं शुभ्र!!!! 
पाच पाकळ्यांचं !!!
 आणि पाकळ्या म्हणजे वेलवेटच जणू!!!!! 

आणि पानांचा रंग तर गडद हिरवा....वा!!!! सुंदरच!

      

     मग पुढे आले तर कमी उंचीची तगरीची झाडे आणि 

खुप नाजूक खुप छोटी छोटी तगरीची फुलं! 

यांना पाहून तर तारका जणू जमिनीवरच आल्या आहेत असं वाटलं!!!

     

     पुढे डबल तगर- एकदम भरीव मस्त वाटलं!!!!!!

     बागेच्या कुंपणाला तगर लावलेली. पण तिची पानं मात्र फिकट हिरवी पण फूल मात्र चांदणीच!!!!!!!
     आणखीन एक गोष्ट लक्षात आली

ती म्हणजे ही फुलं जोडी जोडीने असतात.

 क्वचितच एक फूल असतं.
  
काय मग ?आता या फुलाकडे बघतांना वाटेल का हे बिन वासाचं पाढरं फूल?

की.…हे तर चांदणीचं फूल.




आजचा सुर्योदय

आज जरा उशीराच बाहेर पडले. वाटलं आज प्रखरच झाला असेल सूर्य.
पण चर्नीरोडला मस्त ढग दिसले,म्हणजे काळे पण पावसाळी काळे नाहीत हं!!
त्या ढगांच्या किनारीला सुंदर सोनेरी गडद कडा !!!!
वा!!!! मस्त सुर्यदर्शन होणार.

पुढे आले तर.... आपण चित्र काढतो ना....तसा दिसत होता सुर्य. थोडासाच पण त्याची किरणं छान फाकलेली. थोडी पुढे आले तर परत तो ढगाआड गेला..... पण आपलं अस्तित्व तिथे दाखवत. ढगाला सोनेरी किनार ठेवुन.

मग घरी येतांना मात्र सूर्य प्रखर झाला.

Suprabhat


♥♡♥♡♥♡♥♡♥
मी कुणाला आवडो वा न    
           आवडो
दोन्ही गोष्टी माझ्यासाठी
     चांगल्याच आहेत,
कारण......
ज्यांना आवडते त्यांच्या♥
हृदयात
आणि
ज्यांना नावडते त्यांच्या डोक्यात कायम मी राहते...!
😘

Sunday, 5 April 2015

एक सुंदर अनुभव.

*    एक सुंदर अनुभव.    *

रविवारची संध्याकाळ , आम्ही समुद्रकिनारी फिरायला गेलो होतो. वाळुत जाऊन बसलो  आमचे लक्ष निर्माल्य कलशाकडे गेले. तेथे कचरा गोळा करणारी बाई दिसली. ती काय करते याकडे आमचे लक्ष गेले. तिने आपल्या जवळच्या एका पिशवीत हात घातला. आणि एक थोडी जाडसर प्लास्टिकची पिशवी काढली. वाळुत एक खड्डा केला छोटा. आता आमची उत्सुकता वाढली. त्या खड्ड्यावर ती पिशवी ठेवली. आपल्या जवळच्या दुसऱ्या पिशवीतुन पाण्याची बाटली काढली आणि त्यातील पाणी त्या खड्ड्यावरील पिशवीवर ओतले. बाजुलाच उभ्या असलेल्या कुत्र्याने ते पाणी प्याले व समाधानाने निघुन गेला.त्यानंतर दुसरा कुत्रा आला त्याने उरलेले पाणी प्याले.हे सर्व घडले त्यावेळी ती बाई तेथुन गेली होती.आणि आम्ही हे दृश्य बघत होतो.
      यातुन जे जाणवले ते असे : लोक कोणासाठी काही काम केले तर त्याचा गाजावाजा करतात.
     आपले नांव यावे म्हणुन धडपड करतात.
     एखादी व्यक्ती समाजोपयोगी काम करत असेल तर ती कशी आपल्या जवळची आहे. ते सांगतात.
पण.... या बाईने मात्र खरीखरी भूतदया केली.
हीच खरी ईश्वर सेवा.

हेच खरे पुण्यकर्म !!!

सौंदर्य

मी वाचलेलं ....छानसं  

'चोखा डोंगापरी भाव नोहे डोंगा' असे म्हणणाऱ्या चोख्याच्या अंतःकरणातील भावाचे  सौंदर्य संवेदनशील माणसाला जाणवू शकेल.

     'स्वामी विवेकानंदांच्या चेहऱ्यावरील ज्ञानाचे तेज त्यांच्या चेहऱ्यावर सौंदर्यासारखेच विलसते.'

     'रविंद्रनाथांच्या ऋषितुल्य चेहऱ्यावरील विश्वशांतीची इच्छा त्यांना सुंदर बनवते.'

     'मुलांच्या मेळाव्यात रमलेल्या पंडित नेहरूंच्या मळातच देखणा चेहरा अधिकच उत्फुल्ल दिसतो.'

     'सर्व गोरगरीब, शोषित, पीडितांबद्दल अंतःकरणात अतीव करूणा असलेल्या मदर तेरेसांचा फोटो
      निरखून बघा. तिथे सुंदर स्त्री दिसते.'   

     'विद्वत्तेतून आलेल्या सोज्वळपणाचे सौंदर्य दुर्गा भागवतांच्या चेहऱ्यावर नेहमी जाणवे.'


आणि मला दिसलेलं सौंदर्य....

सिनेमा : डॉ. प्रकाश आमटे
जेव्हा डॉ. डोळ्याचे ऑपरेशन करतात. आणि त्या आजीच्या डोळ्यावरील पट्टी काढतात.
त्या आजीच्याचेहऱ्यावरील हास्य आणि तिचे सौंदर्य ...
मनाला भावले...
*******

Morning Walk

आज ५ एप्रिल २०१५
 सकाळी फिरायला गेले तर चौपाटीवर मस्त वातावरण!
 सळसळती तरूणाई रंगीबेरंगी कपड्यांमधे कसरती करत होती
 मग पुढे मरीन ड्राईव्हला सूर्य दर्शन ...... अप्रतिम...
जणू चंद्रच. मस्त बघत रहावा असं देखणं दृष्य्.....
नजरेत साठवुन ठेवले.

परवाचे सूर्यदर्शन आणि आजचे किती निराळे!!!!!
परवा तर आकाशात कोणीतरी कंदील लावला आहे असे वाटत होते.
रंग लाल पण नजरेला सुसह्य लोभस पुनः पुनः पाहत रहावा असा......
पण..... हे दृश्य काही क्षणासाठीच आणि त्याच वेळी बघायला मिळेल असे नंतर मात्र सूर्य प्रखर होत जातो.

आता ना एक छंदच लागलाय आज कसा असेल सूर्योदय ?
मस्त enjoy करते,
M🌞RNING walk.....