Saturday, 26 March 2016

२६ मार्च १९८१...


अण्णा..

ती संध्याकाळ... आम्ही कधीच विसरू शकत नाही.

अचानक.. हो बोलताबोलता

तुम्ही आम्हाला दुःखसागरात लोटून गेलात

तुम्हाला सुद्धा कल्पना नसेल की तुमचा अंतकाळ आलाय.!
वय पण लहान होतं अवघे ५२ 





कितीतरी आठवणी आहेत तुमच्या..
सुर्योपासना करणारे,
घरात खडावा घालून फिरणारे...
एस.टी. मधे नोकरी करणारे नेहमी रात्रपाळी करणारे..
पोस्टाचे काम आवडीने करणारे...
राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे काम करणारे (तिकडे मामा म्हणून ओळखले जाणारे)
जनसंघाचे काम सुद्धा किती करत होतात.!
स्वतःच्या आईला वहिनी म्हणणारे....
तिची ढगाळ वातावरणात काळजी करणारे...( तिला दम्याचा त्रास होता)
मुलांना चांगली नोकरी मिळावी यासाठी खटपट करणारे...
मला सुद्धा किती छान सांगितलं होतंत...
वेळप्रसंग आला तर हातात कुठलं तरी सर्टिफिकेट हवं..
.म्हणजे नोकरी मिळण्यास अडचण येणार नाही.
म्हणून मी टायपिंग पूर्ण केलं होतं.
तसंच पदवीधर....
आपल्या घराण्यात कोणी मुलगी पदवीधर नाही...
मला वाटतं तू कमीतकमी पदवीधर व्हावस....
अण्णा... मी पदवीधर झाले पण... ते पहायला.. तुम्ही नव्हतात.
तसंच लग्नाचं बघत असतांना..
तुम्हाला वाटत होतं की मुलीला स्थळ इतकं जवळचं हवं.. 
की मुलीच्या आवडता पदार्थ घरी बनला की तो तिला नेऊन देता आला पाहिजे.!
बहिणीभावांवर खुप प्रेम करणारे...
बहिणीला माहेरी आणायचं तर...
 तिच्या सासुला, नवऱ्याला सांगुन माहेरी आणणारे तुम्ही..
( दादा, चार दिवस पाठवा राहायला आमच्याकडे..)
कोणीही अडचणीत असेल तर त्यांना मदत करणारे.

होळी गोकुळाष्टमी... या सणांना जन्मगावी धाव घेणारे

नोकरी बदलीची असल्यामुळे
वेळच्यावेळी कोणाबरोबर पगार पाठवणारे...

जातीधर्माचा भेद तुम्ही कधीच मानला नाहीत.
वयाच्या पन्नास वयापर्यंत भावाकडे जाण्याचा योग आला नाही... पण मनानेच तिकडे पोहोचणारे....
मामाच्या घरी म्हणजे आजोळी सुद्धा वयाच्या पन्नासाव्या वर्षी गेलात ते आठवतंय....
भाच्यांना भाचेजावयांना अगदी मित्र वाटावेत असे संबंध होते तुमचे.
तसेच साडू- साडू कसे संबंध असावेत ते तुम्हाकडे पाहून शिकावे.
तुम्ही नोकरी निमित्त कोणाकडे फारसे गेला नाहीत पण...
तुमची मावसमामे.. सगळी भावंडं कुटुंबासह येत होती.. यातच सगळं येतं....
तुमचं तसंच प्रेम  होतं त्यांच्यावर...
मुक्या भावाची काळजी करणारे... 
नुसती काळजी नाही तर त्याला जेवणाचा डबा लावून देणारे..
आणि त्याचे शेवटचे कार्य करणारे..

पत्नीला नऊवारी साडी आवडते म्हणून दरवर्षी साडी घेणारे..

मदनबाण, मोगरा.. यांचा गजरा आवडतो म्हणून तो आठवणीने आणणारे...
वाडीतील प्रत्येकाबरोबर छान मैत्रीचे संबंध असणारे....

अगदी चहाबाज म्हणजे काय हे तुमच्याकडे पाहून समजले असते,

 इतका तुम्हाला चहा प्रिय होता.

तुम्हाला पिवळा हत्ती सिगारेट आवडत होती. 
पण ती तुम्ही कधी सोडलीत ते आठवत सुद्धा नाही....
तसंच गावाला माघी गणेशोत्सवात पाणीग्रहण नाटकात...
 मला वाटतं काका साहेबांचं काम केल होतंत. मी खुपच लहान होते.
तसंच

सोळा सोमवार हे कडक व्रत तुम्ही केल्याचं आठवतं

अजून छान म्हणजे
 स्वतःचं एका खोलीचं बिऱ्हाड असलं तरी कोणी अडचणीत असेल तर 
त्याची आपल्या घरी नोकरी मिळेपर्यंत, पुढे जागा घेईपर्यंत सोय करणारे...
( आम्ही अगदी मोठे होईपर्यंत कुणीतरी असायचंच)
एका खोलीतून दोन खोल्यांच्या घरात येईपर्यंतचा प्रवास.... 
आम्ही बघितला आहे.... स्वतःचा फायदा होत होता तरीही सर्वांचा फायदा करून दिलात...
 असं कित्ती कित्ती आठवणी आहेत तुमच्या.! कधीच विसरता येणार नाहीत अशा.!

आपल्या कृतीतून कित्तीतरी गोष्टी शिकलो.

★ दिलेली वेळ पाळावी
★ पानात अन्न टाकू नये.
★ कपडे कसे वाळत टाकावेत.
★ आधी कष्ट मग आराम चांगला.
★ कोणाला उसने पैसे देऊ नये. पोटभर खायला घालावे.
★ मामा म्हणून भाचरांबरोबर
आणि काका म्हणून पुतण्याबरोबर कसे प्रेमाने वागावे.
★ नव्या आलेल्या सुनांबरोबर अगदी वडील या नात्याने तुम्ही वागत असत.

कित्तीतरी आठवणी....

न संपणाऱ्या....

ग्रंथ होईल नाही का...

*********************************

तुमची आठवण येतेच, 
असा एकही दिवस नाही की तुमची आठवण आली नाही.

**********************************

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment