Saturday, 23 March 2019

खरवस


आज ना हातगाडीवर मिळतो तो खरवस??? आणला.
मन परळच्या (आजोळच्या) गॅलरीत पोहोचले
शुभम करोति झाले कि जेवण आणि म पाणी भरायचे . 
मामा छोट्या स्टूलावर बसून नळीने पाणी भरायचा
 एका बाजूने नाट्यसंगीत सुरु असे,
 मला कळशीने पाणी भरायला आवडे... 
आजीला विचारायचे आणि पाणी भरायचे
पाणी झाले कि गॅलरीत, गप्पा गोष्टी 
कधी सिनेमा स्टोरी सांगे मोठाभाऊ.
 
हा खरवस वाला मस्त कापून देत असे वड्या . 
आणि तो पानात देत असे.
चार चाकी हातगाडी, पेट्रोमॅक्स चा दिवा, 
अनेक लोक हा खरवस ? घेत, वाटेत जाताजाता खात.

ते बघताना मज्जा वाटायची 
कधी घेतलेला आठवत नाही.
रांगेने बसून कुल्फी मात्र कधीतरी खात होतो
पण हा खरवस... ?

आई म्हणे हा चायनाग्रासचा बनतो

खरा खरवस नाही.

तब्येतीस चांगला नाही.
म कधीच खाल्ला नाही बहुतेक... 
पूर्वी बाहेरचे खाण्याची पद्धत नव्हती.
सर्व काही घरी केले जाई.
योग्य वेळी. श्रीखंड पुरी..
 त्या त्या सणाला. चकली चिवडा लाडू... दिवाळी 
हा खरवस यांना आवडतो.
अस आत्ता म्हणाले.

पण इकडे खरा खरा खरवस अगदी पोटभर मिळत असे 
म गाडीवरचा कोण खाईल खोटा खरवस????
आज अर्धा किलो आणला आता खायचा नाही, 
आणि आई म्हणे खाऊ नये, पण थोडा खाल्ला, 
आणि लहानपणी गॅलरी मध्ये बसून करत असलेले निरीक्षण .... 


तसे संध्याकाळची मारुती मंदिरातील आरती 

आणि त्यावेळी होणारा घंटानाद.! आजही कानात येतो तो नाद.!

रात्री येणारी फुलवाली 

बट शेवंती दवणा मरवा घेऊन येत असे
तिची साडी नेसण्याची पद्धत वेगळी होती 
आणि येणारा कुल्फीवाला....

 तो खरा खरवस नव्हे.

खरा खरवस आता कुठे मिळतो माहित नाही.
आमच्या मावशी गोरेगाव ला राहत 
म 5 ली खरवस आणि 5 लिटर दूध
त्यात साखर वेलची पावडर घालून रात्रभर जागून करत
तसा खरवस आता नाही.
छान घट्ट वड्या होत.
खरतर त्या नोकरी करत.
पण रात्रभर जागून निरनिराळ्या डब्यात करत. 

मग हे डबे स्टेशन वर आणून देत.

इतका छान खरावस पोटभर  खाल्ला  आहे. 

आणि तोसुद्धा आयता. 

प्रेमाने केलेला......


Wednesday, 20 March 2019

गीतेचे सार... आणि गीता माहात्म्य अर्थासह.!



अनन्याश्चिन्तयन्तो मां

ये जनाः पर्युपासते ।

तेषां नित्याभियुक्तानां

योगक्षेमं वहाम्यहम् ।।

                    ९ | २२

असे भगवान श्रीकृष्ण यांनी
 नवव्या अध्यायात गीतेत सांगितले आहे.

 अर्थ:

 जे अनन्य प्रेमी भक्त  मज परमेश्वराला
 निरंतर चिंतन करीत निष्काम भावनेने भजतात ,
 त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या 
माणसांचा योगक्षेम 
मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो.
::::::::::::::::::::::::::::::::::::

काही लोक म्हणतात योगक्षेम म्हणजे 
जेवण खाण्याची व्यवस्था.!

     पण असे लक्षात घ्यावे... 

न मिळालेली वस्तू मिळणे याचे नाव योग व 

मिळालेल्या वस्तूंचे संरक्षण करणे म्हणजे क्षेम.!

::::::::::::::::::::::::::::::::::

गीतेतील उपदेश: 

मरणाचे स्मरण ठेवून वागावे.
हा उपदेश फार मोलाचा आहे.

गीतेचे सार असलेला अध्याय कोणता?

असे म्हणता येईल कि 
नवव्या अध्यायात गीतेचे सारे सार आले आहे.
 ( काही लोकांना हे मान्य नाही ) 
ज्ञानेश्वरांच्या मते गीतेचे सार नवव्या अध्यायात आहे.
 ज्ञानेश्वरांनी जिवंत  समाधी घेताना
 ९ वा अध्याय मांडीवर ठेवून जिवंत समाधी घेतली.

गीता-गंगेच्या बाबतीत असे म्हणता येईल कि, 

९ वा अध्याय - हरिद्वार
१२ वा अध्याय - काशी
१५ वा अध्याय - प्रयाग याप्रमाणे आहेत.

- न्या. राम केशव रानडे-

संकलन.
*******************

|| अथ गीतामाहात्म्यम् ||


गीताशास्रमिदं पुण्यं 
यः पठेत्प्रयतः पुमान् ।
विष्णोः पदमवाप्नोति
भयशोकादिवर्जितः ।।

ह्या पवित्र भगवद्गीतारुपी शास्त्राचे
 जो मनुष्य प्रयत्नपूर्वक पठण करेल
, तो भय, शोक इत्यादीपासून
 मुक्त होऊन विष्णूचे पद (मोक्ष) प्राप्त करतो.

गीताध्ययनशीलस्य 
प्राणायामपरस्य च ।
नैव सन्ति हि पापानि
पूर्वजन्मकृतानि च ।।

जो भगवद्गीतेचा सातत्याने अभ्यास करतो
 आणि नित्यनेमाने प्राणायाम करतो त्याची
या आणि पूर्वजन्मातील पापे शिल्लक राहत नाहीत.

मलनिर्मोचनं पुंसां
जलस्नानं दिने दिने ।
सकृद्गीताम्भसि स्नानं
संसारमलनाशनम् ।।

दररोज पाण्याने स्नान केल्यामुळे
 माणसे शरीराच्या मळापासून मुक्त होतात.
 (परंतु) गीतारुपी जलात एकदाच स्नान केल्याने 
संसाराच्या मळाचा (पापांचा) नाश होतो.

गीता सुगीता कर्तव्या 
किमन्यैः शास्त्र विस्तरैः ।
या स्वयं पद्मनाभस्य
मुखपद्माद्विनिः सृता ।।

(एकच) गीता " सुगीता " करावी 
(गीतेचे नीट अध्ययन करावे) 
कि जी स्वतः श्रीकृष्णाच्या मुखकमलातून बाहेर पडली आहे. 
(गीतेचे नीट अध्ययन केले असता)
इतर शास्त्र विस्ताराची काय आवश्यक्यता??

भारतामृतसर्वस्वं 
विष्णोर्वक्त्राद्विनिः सृतम्
गीतागङ्गोदकं पीत्वा 
पुनर्जन्म न विद्यते ।।

महाभारतरुपी अमृताचे सार सर्वस्व असलेले,
 विष्णूच्या (कृष्णाच्या) मुखातून बाहेर पडलेले 
गीतारुपी गंगेचे पाणी प्राशन केल्यावर पुनर्जन्म येत नाही.

सर्वोपनिषदो गावो 
दोग्धा गोपालनन्दनः
पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता
दुग्थं गीतामृतं महत् ।।

सर्व उपनिषदे या गायी आहेत.
 श्रीकृष्ण हा दोहन करणारा आहे. 
बुद्धिमान अर्जुन वासरू आहे आणि
 त्या गायींचे दूध म्हणजे गीतारुपी मोठे अमृत आहे.

एकं शास्त्रं देवकीपुत्रगीत
मेको देवो देवकीपुत्र एव।
एको मन्त्रस्तस्य नामानि यानि
कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा ।।

देवकीपुत्र श्रीकृष्णाने गायलेले भगवद गीता
 हे एकच शास्त्र आहे. 
देवकीपुत्र श्रीकृष्ण हाच एकमेव देव आहे.
 त्याची जी नामे आहेत तोच एक मंत्र आहे.
 त्या देवाची म्हणजे श्रीकृष्णाची सेवा हेच एकमेव कर्म आहे.

हरी ॐ.... 

ज्याचे स्मरण केल्याने पापांचा नाश होतो,
 त्याचे नाम 'हरी'
<><><><><><><><>

• गीता वाचायच्या अगोदर गीता माहात्म्य वाचायची पद्धत आहे.
• गीता वाचण्यामुळे काय लाभ होतो ते या माहात्म्यात सांगितले आहे.
• अनेक ग्रंथ वाचण्यापेक्षा अनेक वेळा वाचण्याजोगा एकच ग्रंथ म्हणजे गीता.
• गीतेत कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग असे तीन योग आहेत.
• परंतु प्रामुख्याने कर्मयोग हाच सांगितला आहे.
• श्रीमद्भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रन्थ आहे.


*******************

संकलन... पुस्तकातील अर्थ आहे.


Monday, 11 March 2019

कासव महोत्सव....!


आपले कोकण...

आमचा गाव आंजर्ले..

आणि नंतर वेळास येथे भेट.!

मस्त कोकण दर्शन....
उत्तम driving जावयाचे
छान व्यवस्थापन मुलीचे

कुठे कशी सायकलने गेली त्या भागात
 कुठे कशी धावली मॅरेथॉन.!
कुठल्या किनाऱ्याने चालत कुठल्या किनाऱ्यापर्यंत गेली...
सर्व सांगत होती अधून मधून,

 छान वाटले.!

आमच्या गावाला आम्ही खूपच वर्षांनी गेलो.
नेहमी एस टी ने जातो.
आज मुलीच्या गाडीने जाताना छान वाटले
दरवेळी कोणाकडे तरी उतरण्याची सोय दीर करत,  
आज मुलीने नेले त्यामुळे मस्त अशा हॉटेल/रिसॉर्ट मध्ये उतरलो,
त्यामुळे कोणाला भेटायला गेलो तर आम्ही सहज भेटायला आलोय
राहणे जेवण नाश्ता तिकडे सोय आहे... असं सांगताना छान वाटले...

कासव महोत्सव.!!!

 खरतर आम्ही कासव महोत्सवासाठी आंजर्ले येथे गेलो.
पण.... तिकडे १५ तारखेनंतर कासवे बघायला मिळतील कदाचित.! 
असे तेथील ( स्थानिक) पेपर मध्ये आले होते दोन दिवसांपूर्वी.!!!
तेथील समुद्रावर
 फक्त तीन टोपल्या अंडी आहेत असे कळले...
 रोज सकाळी सात वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता
 टोपली उघडून बघतात कि अंडी पक्व झाली का?
 जर झाली तर आपल्याला पिल्ले बघायला मिळतात...
 नाहीतर ती फेरी जाते 
अर्थात समुद्र किनारा आणि सुंदर असे कोकण दर्शन होते.

"वेळास"

 या गावी बघायला मिळतील कदाचित ,
 म्हणून पहाटे साडेपाच वाजता निघालो... 

चलो वेळास.

     वेळास या ठिकाणी सकाळी  पावणेसात वाजता पोहोचलो.
पण तिकडे आज सकाळी एकही कासव जन्मले नाही.
तिकडे तेरा टोपल्या अंडी आहेत...

म मात्र निजसुरे काकांबरोबर गप्पा गोष्टी 
नाश्ता चहा कॉफी घेऊन मुंबईकडे परतलो.. 
यांच्याकडे राहणे जेवणे याची उत्तम सोय आहे..
 छान गप्पा,
सर्व सोयी,
 घरासमोर मस्त डोंगर... 
घरातील मदतनीस आपल्याबरोबर अगदी प्रेमाने बोलतात.
गाडी पार्किंगची सोय आहे.
मला, आई तुम्हाला काही हवंय? 
आई घ्या अजून पोटभर आहे नाश्ता...
असे गोड भाषेत सांगत होती.
 (हि मंडळी न शिकलेली पडेल ते काम करणारी )
जवळच समुद्र.!! 

आमचे गाव...

 आंजर्ले दापोलीच्या पुढे आहे.
सुंदर समुद्र किनारा...
नारळ पोफळी आंबे यांचे गाव.!
एका बाजूला असलेले लोक,
 घराच्या मागच्या बाजूला समुद्र आहे. 
वाडीतून चालत गेले कि मागेच समुद्र.!

येथे प्रसिद्ध काय???

 दुर्गादेवी आणि 

कड्यावरचा गणपती बाप्पा.... 


तर किंवा छोट्या नावेने या भागातून त्या भागात जायचे...
आता मात्र ब्रिज बांधला आहे
 त्यामुळे आपल्या वाहनाने
 एस टी, रिक्षाने ये जा होते.....
छोटेसे सुंदर से गाव.!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~
पण या गावात आमचे असे काही नाही.
यांच्या चुलत भावाचे
 छोटे खेड्यामधले घर कौलारू असे घर आहे
 ते नेहमी बंद असते... ते मुंबईत असतात... 
आणि आता वय मोठे जवळपास 70 आहे.

आमच्या गावाजवळ हर्णे मुरुड आहे.

जे महर्षी कर्वे यांचे गाव.!


आम्ही बऱ्याच वर्षानंतर गेलो.  
मला असे वाटले कि

 दुर्गादेवी चे... बोलावणे आले, / बुलावा आया


म तिची साडीने ओटी भरली... 
प्रार्थना केली,
 आजपर्यंत सर्वकाही छान झाले आहे तसेच यापुढे छान होऊ दे... 
अशीच तुझी कृपा असुदे.!
शांत सुंदर मंदिर!
हिच्या उत्सवासाठी आजपर्यंत गेले आहे...
 जी काही चारपाच वेळा गेले असेन ते.!!
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

कड्यावरचा गणपती


 पूर्वी कड्यावर पायऱ्या चढून जावे लागे, गावातून,
     केळशीला गेलो तेव्हा कळले कि गाडी वरपर्यंत जाते, 
आता तर मंदिर परिसर अतिशय सुरेख आहे.

ह्या मंदिराचा आराखडा 
यांचे मोठे काका यांनी काढला ते शाहीर पण होते..
 दरवर्षी उत्सवात त्यांचे पोवाडे असत
(तिकडे प्रथम दर्शनी बोर्ड आहे आराखडा  नावासकट)
 आणि यावर्षी यांच्या चुलत भावाने 
आपल्या विहिरीचे पाणी मंदिराकरिता पुरवले आहे
संपूर्ण,  खर्च केला त्यांचा सत्कार केला.
आणि तेथील लोक आदराने त्यांचा उल्लेख करत होते.
छान वाटले.!
 तिकडे त्यांनी फार 
वर्षापूर्वी घर बांधले आहे.
पण कोणीच राहत नाही.
मंदिर बांधले तेव्हा प्रथम यांच्या काकांनी सुरुवात केली 
आणि म निजसुरे यांनी पूर्ण केले
 पाण्याचे दुर्भिक्ष आता होणार नाही बहुतेक.!!
 आता छान पाणीपुरवठा होतो

*भक्तनिवास.*

राहण्याची उत्तम सोय आहे.
 आपल्यासारखे पर्यटक
यांनी विचार करायला हवा तिकडे गेल्यावर
कि कोकणात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते पाणी जपून वापरले पाहिजे.

 आंजर्ला येथे लग्नवरात


तेथे लग्न वरात पाहायला मिळाली.
बैलगाडीत नवरा सुटाबुटात बसला होता, आणि नवरी भरजरी साडी नेसून. 
आणि बायका मुली उत्साहाने  लेझीम खेळत होत्या...
पेट्रोमॅक्सच्या बत्ती...


<><><><><><><><>

 रविवारी सकाळी निघालो तर सकाळीच कोल्हा दिसला.
आणि शनी , रवी दोन्ही दिवशी मोराची जोडी दिसली,
वेगवेगळ्या ठिकाणी.!!

*******************
 जंगल सफारी केली तर
 वाघ सिंह दिसतीलच असे नाही लक असेल तरच दिसेल
 तसे कासवे कधी जन्म घेतील अंड्यातून बाहेर येतील हे सांगता येत नाही.

सकाळ संध्याकाळ टोपल्या चेक कराव्या लागतात.


काही वेळा एक दोन कासवे जन्म घेतात
 तर काही वेळा 40,50 सुध्दा

काही समुद्रात जातात तर
 काही तेथपर्यंत पोहोचण्यापूर्वीच पक्षांची शिकार होतात
 काही अशक्त असतात त्यांना 
स्वयंवसेवक मदत करतात....

Friday, 1 March 2019

नारळवडी....




 नारळवडी करायला अगदी सोप्पी.

नारळ जितका असेल तेवढी साखर घ्यायची
थोडे तूप काढइत घेऊन त्यावर नारळ म साखर असे घालून हाताने एकत्र करायचे आता त्यात दूध घालून गॅस वर ठेवून ते मिश्रण ढवळत राहायचे साखर विरघळली कि त्यात दुधाची पावडर दुधात मिक्स करून घालायची आता ढवळायचे मिश्रण पातेल्याला सोडून मध्यभागी गोळा होऊ लागेल म वडी होईल हे निश्चित.! आता गॅस बंद करून पातेले खाली उतरवून सारखे ढवळत राहावे.... म ताटाला तुपाचा हात लावून मिश्रण पसरावे ताटावर

हात भाजेल तर

 हातात प्लास्टिक पिशवी लावावी. 
वाटीच्या बुडाला तूप लावून पसरावे
किंवा ताट उपडे ठेवून त्यावर मिश्रण पसरावे व लाटणे फिरवावे...
मिश्रण सुकण्या आधी झटपट पसरावे.. व वड्या कापाव्या


जर रंगीत आवडत असतील तर....

 केशर इसेन्स मिळतो तो घालावा. 
किंवा बिट, आंबा मावा घालावा. 
खाण्याचा रंग घालावा . 
खाण्याचा रंग मिश्रण घोटताना घालावा. 
नाहीतर कडू लागेल.
 ( मी मात्र कधीच रंग घालत नाही. )
माझ्या सासूबाईंनी तिरंगी वड्या केल्या होत्या 
फारच सुंदर
म मी एकदा करून बघितल्या होत्या
त्यावर्षी राखी पोर्णिमा आणि स्वतंत्रता दिवस 
एकाच दिवशी आले होते
 मी प्रसादाचे नारळ मिळाले कि करते 
म्हणजे कोणी आले कि प्रसाद म्हणून देता येते

हे मदत करतात..
मिश्रण थापणे
वडी कापणे....
आणि चार चार वड्या पिशवीत भरणे...
सर्व करतात

कोणतीही लाडू वडी करताना सम प्रमाण घ्यावे


आणि वडी पडणार नाही असे वाटले तर... 

वरून पिठी साखर घालावी म्हणजे हमखास वडी होते...
 पिठी साखर घातली कि घोटावे आणि ताटावर किंवा ट्रे मध्ये पसरावे . 
मी मात्र कधी घालत नाही
अशीच वडी होते

दूध पावडर घातली कि सुंदर लागते. खवा घातला असे वाटते . 

 

वडी करण्यासाठी :

 प्रथम दोन वाटी खोवलेला नारळ आणि दोन वाटी साखर 
एक वाटी दूध, थोडे तूप अगदी एखादा चमचा

आणि 10₹ ची दूध पावडर आणि एक वाटी दूध
वेलची पावडर किंवा केशर इसेन्स 
हे मिश्रण तयार झाले कि घालावे.  
कोणतीही वडी करताना चांगले घोटावे

साधारण 25 वड्या होतील बेताच्या आकाराच्या


वडी पडेल असे वाटले कि पसरावे

घाई असेल तर मुळी च करूनये. 

शांतपणे करण्याचा पदार्थ आहे



विकत मिळते तो नारळी पाक असतो बहुतेक....
अगं नारळवडी करायला अगदी सोप्पी